परभणी । Parbhani
काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झाले.
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालण्यासाठी खोटं वक्तव्य केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानाचं रक्षण करणाऱ्या सोमनाथची हत्या करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान जोपर्यंत त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर पुरावे द्यावेत अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सोमनाथला वेगवेगळ्या आजार होते. त्याला कुठलाही आजार नव्हता. माझा मुलगा कुठेही सहभागी नव्हता. त्याला निर्घृणपणे पोलिसांनी मारले. जोपर्यंत त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमच्या समाधान होणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत की आमचा सोमनाथ कुठे होता? त्यांनी कोणाला दगड मारले? कुणाचं काही जाळपोळ केली का? विनाकारण आमच्या मुलाला मारले. त्यामुळे जोपर्यंत ही चौकशी तात्काळ होत नाही दोष अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नसल्याची प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या प्रतीची एका व्यक्तीने विटंबना केली होती. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी आक्रोश व्यक्त करत आंदोलन केले होते. या दरम्यान जाळपोळ आणि दगडफेक घडली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा समावेश होता. मात्र, सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला होता.