अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) सेवा बजावलेले काही अंमलदार पुन्हा एलसीबीमध्ये नियुक्ती मिळवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, अशा अंमलदारांना पुन्हा एलसीबीमध्ये संधी दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी (30 जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे अशा अंमलदारांचे एलसीबीकडे परतण्याचे दरवाजे आता बंद झाले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोणत्याही अंमलदाराची नियमित नियुक्ती झालेली नाही. सध्या एलसीबीचा संपूर्ण कारभार संलग्न अंमलदारांच्या खांद्यावर आहे. या पार्श्वभूमीवर अधीक्षक घार्गे यांनी एलसीबीसाठी नवीन अंमलदारांची नियुक्ती केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, काही अंमलदारांनी यापूर्वी एलसीबीमध्ये सेवा बजावली असून ते पुन्हा नियुक्तीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याच संदर्भात ‘सार्वमत’ने याआधी अंमलदारांच्या हुजरेगिरी विरोधात “घार्गे-कबाडी टेस्ट!’ आणि ‘एलसीबीत जुनेच अंमलदार पुन्हा येणार का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते.
पत्रकार परिषदेत एलसीबीच्या नियुक्तीबाबत विचारणा करण्यात आली असता, अधीक्षक घार्गे म्हणाले, जिल्ह्यात घडणार्या गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी एलसीबीवर असते, त्यामुळे ही शाखा सक्षम आणि कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे. सध्या एलसीबीमध्ये केवळ चार अंमलदार कार्यरत आहेत आणि उर्वरित काम संलग्न अंमलदारांकडूनच पार पाडले जात आहे. त्यामुळे एलसीबीसाठी नव्या अंमलदारांची निवड केली जाणार आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वी एलसीबीमध्ये सेवा बजावलेल्या कोणत्याही अंमलदाराला पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यांनी ज्या ठिकाणी सध्या नियुक्ती आहे, तिथेच त्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे.
नव्या अंमलदारांची निवड करताना त्यांची आतापर्यंतची कामगिरी, धाडसीपणा, गुन्हेगारी टोळ्यांविषयीची माहिती, व पोलीस ठाण्यातील तपास कामगिरीचा विचार करूनच संधी दिली जाईल. एलसीबीला संलग्न अंमलदारांची नवीन भर घालण्यात आली असून, त्यातील चांगली कामगिरी करणार्यांना एलसीबीमध्ये संधी दिली जाईल. उर्वरित अंमलदारांच्या अनुभवाचा उपयोग करून त्यांना संगमनेर शहर, श्रीरामपूर शहर, शेवगाव अशा महत्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली देण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा फायदा स्थानिक गुन्ह्यांच्या तपासात होऊ शकेल, असेही घार्गे यांनी सांगितले. अधीक्षक घार्गे यांच्या या भूमिकेमुळे नवीन व धाडसी अंमलदारांसाठी एलसीबीमध्ये काम करण्याचे नवीन दरवाजे उघडले आहेत. दुसरीकडे, एलसीबीमध्ये पुन्हा नियुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करणार्या जुने अंमलदारांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
शिफारसशाहीचा अंत निश्चित
अनेक अंमलदार एलसीबीमध्ये पुन्हा नियुक्ती मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी, तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकार्यांची शिफारस आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शिफारशींचा परिणाम पूर्वीच्या काळात एलसीबी नियुक्तींवर होत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून एलसीबीमध्ये कोणत्याही अंमलदाराची नवी नियुक्ती झालेली नव्हती. मात्र, यंदा शिफारसशाहीचा पूर्णतः अंत होणार असून, अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, फक्त कामगिरीच्या आधारावरच नियुक्ती केली जाईल. शिफारस असूनही कामगिरी समाधानकारक नसेल, तर त्या अंमलदाराला संधी दिली जाणार नाही.
विशेष पथक गाशा गुंडाळणार !
अवैध धंद्यांविरोधात ठोस कारवाई करत जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण करणारे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेले विशेष पथक गाशा गुंडाळणार आहे. दोन महिन्यांपूर्वी परि. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन करण्यात आले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कामकाज आता पूर्ण ताकदीनिशी सुरू झाल्याने विशेष पथकाची आवश्यकता कमी झाली आहे. या पथकात कार्यरत असणार्या अंमलदारांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठविण्यात येणार आहे. तर काही अंमलदारांची कामगिरी पाहून त्यांना एलसीबीत काम करण्याची संधी देण्यात येईल, असे अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.




