Thursday, July 23, 2026
HomeनगरAhilyanagar : पोलीस आता थेट गावाच्या दारी

Ahilyanagar : पोलीस आता थेट गावाच्या दारी

‘एक दिवस, एक गाव भेट’ || अहिल्यानगर तालुका पोलिसांचा जनसंपर्क उपक्रम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी ‘एक दिवस, एक गाव भेट’ हा अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दररोज एका गावाला भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, गावपातळीवरील समस्या समजून घेऊन तातडीने मार्गदर्शन व मदत करण्यावर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना नागरिकांशी संवाद वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याने पोलीस यंत्रणा आता अधिक लोकाभिमुख पध्दतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याने हा उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक कायदेशीर अडचणी किंवा तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात जाण्यास संकोच करतात. काही वेळा भीतीमुळे नागरिक पुढे येत नाहीत. ही मानसिकता बदलून पोलीस हे जनतेचे मित्र आहेत, हा संदेश कृतीतून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

या संवादभेटीत पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समित्यांचे पदाधिकारी, बचत गटांच्या महिला तसेच युवकांशी चर्चा केली जाणार आहे. गावातील वाद स्थानिक पातळीवरच मिटविणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळविणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव, महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि तरूणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.

याशिवाय गावांमधील अवैध धंद्यांवर नियंत्रण, चोरी आणि सोनसाखळी चोरांपासून सावध राहण्याबाबत सूचना, तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भातही नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूईछत्तीसी, वाळकी, चिंचोडी पाटील, अरणगाव, चास-कामरगाव, नेप्ती आदी मोठ्या गावांमध्ये या उपक्रमावर विशेष भर दिला जाणार आहे. या माध्यमातून महिला, मुले आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती कमी होऊन पोलिसांची सकारात्मक प्रतिमा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलीस दल हे नागरिकांच्या सेवेसाठी आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही थेट जनतेत जात आहोत. गावातील वाद गावातच मिटावेत आणि नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
– गणेश वारूळे, सहायक पोलीस निरीक्षक, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे.

ताज्या बातम्या

नाशिक रिंगरोड प्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत

0
मुंबई | उद्धव ढगे पाटील Mumbai नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची (अलाइनमेंट) तसेच रिंग रोडमध्ये झालेल्या जमीन खरेदी...