नाशिक । प्रतिनिधी | Nashik
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर (Hit and Run Case) समोर आलेल्या मुद्यांमुळे नाशिक पोलीस (Nashik Police) अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यानुसार आता कोणत्याही पालकाने अल्पवयीन मुलास दुचाकी व कार चालविण्यास किल्ली दिली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, फेटल अपघात हिट अँन्ड रनच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी (Police) प्रबोधन व जनजागृती करण्याचे ठरविले असून त्यानुसार कारवाई सुरु केली आहे.
पुण्यातील पोर्शे कारच्या (Porsche Car) धडकेत दोघे ठार झाल्याचे उघड झाल्यावर अपघातास (Accident)कारणीभूत ठरलेला अल्पवयीन चालक मद्यपान करुन वाहन चालवित असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करुन अटक करण्यात आली. दरम्यान, या अपघातानंतर अनेक मुद्दे, भादवि कलम, एमव्हीए अॅक्ट, वैद्यकीय तपासण्या, आरटीओ, टँक्स, मुलाचे संशयित पालक, त्यांचे मुलांबद्दलचे अतिप्रेम, अल्पवयीनांना पब, बार, मद्य दुकानातून दारु, बिअरची विक्री आदींसह मुद्दे, कंगोर उघडे पडले. या हिट अँन्ड रन केसमध्ये संशयित मुलाने मद्यपान करुन कोट्यवधी रुपयांची पोर्शे कार भरधाव वेगात चालविल्याचे उघड झाले. यानंतर हा मुलगा पुण्यातील प्रख्यात व्यावसायिकाचा असल्याचे समोर आल्याने या हिट अँड रन प्रकरणाला सर्वांनीच अग्रभागी घेतले.
यात महत्त्वाचे मुद्दे व खुलासे समोर आल्याने आतापर्यंत मुलाचे वडील, आजोबा व डॉक्टरांना अटक झाली. तर, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झाले. हा संपूर्ण घटनाक्रम अद्यापही सुरु असून अशा प्राणांतिक अपघात, हिट अन्ड रनच्या केसेसमध्ये मद्यपि चालक, अल्पवयीन चालकांचा प्रत्यक्ष सहभाग आढळला आहे. अल्पवयीन मुलांच्या सर्वच मागण्या आई वडील मान्य करुन मुलांमुलींची पाठराखण करताना दिसत असल्याने त्यांना कायद्याची भिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कायदा व नियम मोडून अल्पवयीन मुलांच्या हातात विनालायसन्स दुचाकी व चारचाकीच्या किल्ली दिल्या जातात. अपघात करुन आलेल्या मुलास कायद्याच्या व समाजाच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. त्यामुळे आपला विचार, समाज, मानसिकता कुठे चालली आहे, हे ज्याने त्याने समजून घेणे गरजेचे आहे.
शहरात यापूर्वी भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या अपघातात पाच प्रवाशांची क्षमता असलेल्या स्विफ्ट कारमध्ये तब्बल आठ मित्र मैत्रिणी बसले. टायर फुटून झालेल्या या अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सर्वच मृत मुले लग्न सोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते. यात १६ ते १७ वयोगटातील तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश होता. हे सर्व विद्यार्थी अकरावी-बारावीमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे मनमर्जी, हौस करतांना क्षणांत काय घडेल याची जाणीव ठेवणेही गरजेचे आहे.
त्यातच गंगापूर रोडवरील बारदान फाटा चौफुलीजवळ मार्च २०२४ मध्ये भरधाव कारचे टायर फुटून चालकाचा ताबा सुटला. कार रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. दोघेजण गंभीर जखमी झाले. तेव्हा मृतांमध्ये एक तरुण व एका तरुणीचा समावेश होता. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा काकांची कार घेऊन परीक्षा संपल्याने गंगापूर बॅकवाॅटर येथे फिरण्यासाठी गेले होते, हे उघड झाले होते. दरम्यान, अल्पवयीन चालक मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, हिट अँड रन प्रकरणांत शिक्षा व दोषसिद्धीचे प्रमाण अत्यल्प आहे. ते वाढविण्यासाठी यंत्रणांना पुरावे संकलनासाठी जादा प्रयत्न करावे लागणार आहेत.
बार, मद्य दुकानांवर कारवाई
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर अल्पवयीनांना मद्य विक्री करण्याबाबत नव्या सूचना मद्यविक्रेते, बार चालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, कुणीही नियमबाह्य पद्धतीने विक्री करत असतील, त्यांच्यावर उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कारवाई करणार आहे. सोबतच, अल्पवयीनांच्या हातात वाहने देऊच नका, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.