ठाणे | Thane
भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक (Bhiwandi Mayor Election) आज (शुक्रवारी) पार पडली. यात महापौरपदी भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना सर्वाधिक ४८ मते मिळाल्याने ते विजयी झाले आहेत. भाजपकडून आधी नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, नंतर स्नेहल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट पडले होते.
यानंतर भाजपचे बंडखोर नारायण चौधरी (Narayan Chaudhary) यांनी काँग्रेसच्या (Congress) सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपमधून फुटलेल्या चौधरी यांना पाठिंबा जाहीर केला होता. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बंडखोर नारायण चौधरी यांना ४८, भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना १६ आणि कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना २५ मते मिळाली.
यात चौधरी यांना काँग्रेसची ३०, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे १२ आणि भाजपची (BJP) ०६ मते मिळाली. त्यामुळे एकूण ४८ मते मिळाल्याने नारायण चौधरी यांची भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली. काही दिवसांपूर्वी भाजपने चंद्रपूर महापालिकेत (Chandrapur Mahapalika) काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीने आपला महापौर बसवला होता. यानंतर आता त्याचा बदला काँग्रेसने भिवंडी महापालिकेत भाजपमधील फुटीने घेतला.
दरम्यान, महापौरपदासाठी एकूण १० नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यापैकी एक अर्ज ग्राह्य धरला. माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलीस एस्कॉर्टने येत असल्याने वेळ वाढवण्याची मागणी झाली; मात्र प्रक्रिया थांबवण्यास नकार देण्यात आला. अखेरी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यानंतर नारायण चौधरी (काँग्रेस-राष्ट्रवादी सेक्युलर फ्रंट समर्थित), विलास पाटील (शिवसेना-शिंदे गट) आणि स्नेहा पाटील (भारतीय जनता पार्टी) यांच्यात लढत झाली.




