जळगाव | Jalgaon
जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून (Pachora-Bhadgaon Assembly Constituency) ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) निवडणूक लढवलेल्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांनी आज (मंगळवारी) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून, त्यांनी नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार स्व. आर. ओ. तात्या पाटील यांच्या वैशाली सूर्यवंशी या कन्या आहेत. आर.ओ. तात्या यांचा राजकीय वारसा त्यांचे पुतणे आणि किशोर आप्पा पाटील (MLA Kishor Aappa Patil) यांच्याकडे आला. किशोर आप्पा पाटील हे दोनवेळा विधानसभेवर निवडून आले असून, शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत सक्रिय झाल्या. आर.ओ तात्यांचा वारसदार कोण यावरून पाचोरा -भडगाव तालुक्यात अनेकदा वादही झाले.
२०२४ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) ही वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर आप्पा पाटील यांच्याविरुद्ध लढवली होती. या निवडणुकीत सूर्यवंशी यांना ५८ हजार तर किशोर आप्पा पाटील यांना ९७ हजार मते मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात उबाठाला गळती लागली, अनेक जण सत्ताधारी पक्षांकडे गेले.त्याला वैशाली सूर्यवंशी या देखील अपवाद ठरल्या नाहीत. आज त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच या मतदारसंघात आता युतीचे पारडे जड झालेले दिसत आहे. अर्थात कोण किती मनापासून काम करतो यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल अवलंबून असणार आहेत.
दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून वैशाली सूर्यवंशी हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पाचोरा येथील भाजपाचे माजी आमदार दिलीप वाघ,अमोल शिंदे, मधुकर काटे, डी.एम. पाटील, सुभाष मुंडे, बंशीलाल पाटील, प्रदीप बापू पाटील, अनिल पाटील, गोविंद शेलार हे देखील उपस्थित होते.
पक्ष प्रवेशानंतर वैशाली सूर्यवंशी काय म्हणाल्या?
आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करून नवीन वाटचाल सुरू करत आहे. माझे वडील तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांनी दोनदा युतीचे आमदार म्हणून जनसेवेचा मापदंड प्रस्थापित केला होता. त्यांचा वारसा नेटाने पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच वडीलांचा जनसेवेचा वारसा कायम राखत आपली वाटचाल असेल असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.





