नाशिक | Nashik
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (रविवारी) माध्यमांशी बोलतांना महायुतीमधील (Mahayuti) चार ते पाच जणांचे मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला होता. यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचाही समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (सोमवार) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किलपणे भाष्य करत मंत्री कोकाटेंना टोला लगावला आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज नाशिकमधील (Nashik) द्वारका सर्कल येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राऊत यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “मीही आता घरी जात आहे. माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा ही विरोधकांची मागणी आहे. त्यावर मी काय बोलू”, असे त्यांनी म्हटले.
तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केलेल्या मारहाणीवर बोलतांना ते म्हणाले की, “वरिष्ठांवर पत्ते उधळल्यामुळे सूरज चव्हाण यांना राग आला असेल. कारण ते तरुण आहेत. सुनील तटकरे यांच्यावर पत्ते उधळणे योग्य नाही ते पत्ते खेळत नव्हते”, असे म्हणत भुजबळ यांनी माणिकराव कोकाटे यांना टोला लगावला.
तसेच “द्वारका येथील वाहतूक कोंडी (Traffic Jam) पूर्णपणे सोडण्यासाठी आणि भुयारी मार्ग, उड्डाण पुलाचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा काळ लागू शकतो”, असेही छगन भुजबळ म्हणाले. तर योग्य वाहतूक नियोजनासाठी पोलिसांना (Police) ट्रेनिंगची गरज आहे”, असेही त्यांनी म्हटले.





