मुंबई | Mumbai
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळाच्या अधिवेशनात मोबाईलवर (Mobile) रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समोर आणला होता. त्यामुळे कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यामुळे कोकाटे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवारांनी त्यांना पुन्हा अभय दिल्याचे दिसून आले.
दोन दिवसांपूर्वी कोकाटे यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी अजित पवारांनी ‘तुमच्यामुळे सरकारची (Goverment) बदनामी होत आहे. बोलताना भान ठेवायला हवे, असे म्हणत कोकाटेंचे कान टोचले होते. त्यावर कोकाटे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत यापुढे बोलतांना, वागताना काळजी घेईल, असे म्हटले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांची बैठक घेत त्यांचा चांगलाच ‘क्लास’ घेतला होता. यापुढे अशी कृत्य खपवून घेणार नाही, ही शेवटची संधी आहे, असे म्हणत त्यांनी या सर्व मंत्र्यांना तंबी दिली होती. तसेच वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्याचे सुतोवाच देखील त्यांनी केले होते. यानंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कारण आज (गुरुवार) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या तिघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. यात कोकाटे यांच्या मंत्रीपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. कोकाटे यांना मंत्रिपदी कायम ठेवून त्यांच्याकडे असणारे कृषीखाते काढून त्यांना दुसरे खाते देण्याबाबत निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांना रमी खेळणे चांगलेच भोवणार असल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार?
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्यादी अतिथीगृहावर भेट घेतली. मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आता त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.




