नवी दिल्ली | New Delhi
गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलत नवीन तारीख दिली. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी नवीन वर्षी म्हणजे २१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांसह उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून बाहेर पडले होते. यानंतर शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगानेही शिंदेंच्या बाजूने निर्णय देत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिले होते. त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता.
न्या. सूर्यकांत आणि जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हावरही विचार करण्यास खंडपीठाने सहमती दर्शवली आहे. या प्रकरणावर कायदेशीर मुद्दे समान असून ते एकमेकांवर अवलंबून असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यामुळे या दोन्ही खटल्याची आता एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे. आता या दोन्ही खटल्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुरू होईल. त्याशिवाय २२ जानेवारी २०२६ लाही कुठलेही अन्य महत्त्वाचे खटले ठेवू नयेत असे कोर्टाने निर्देश दिले आहेत. जेणेकरून २१ आणि २२ जानेवारी २०२६ रोजी या दोन्ही दिवसांत सुनावणी सुरू राहू शकेल.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत.तर याआधीच्या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून निकाल दिला. यावेळी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आले होते.




