नवी दिल्ली | New Delhi
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) दुसऱ्या टप्प्यात इराण युद्धावर चर्चा करण्याच्या मागणीवरून संसदेत मोठा गोंधळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. त्यानंतर काँग्रेस खासदारांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न देऊन पक्षपाती पद्धतीने काम केल्याचा आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर कालपासून (मंगळवारी) चर्चा सुरु झाली आहे. या अविश्वास प्रस्तावावर आज (बुधवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नाराजी व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
यावेळी ते म्हणाले की, “लोकसभा अध्यक्षांवर आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. अध्यक्षांचे पद पक्षीय राजकारणापेक्षा वरचे असते. त्यामुळे त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, म्हणजे जगभरात भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर शंका निर्माण करण्यासारखे आहे. जवळपास चार दशकांनंतर असा प्रस्ताव पुन्हा आणण्यात आला आहे, ही खेदजनक बाब आहे. आम्हीही बराच काळ विरोधी पक्षात होतो, तरीही भारतीय जनता पक्षाने कधीही लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला नाही. अविश्वास प्रस्ताव हा रोजचा प्रकार नाही. अध्यक्षांच्या पदाचे महत्त्व लक्षात घेऊन अशा गोष्टींचा विचार करायला हवा”, असे अमित शाह यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “सभागृह चालवण्यासाठी ठराविक नियम आहेत आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. एखादा सदस्य नियमांकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला रोखणे, इशारा देणे किंवा बाहेर काढणे हा अध्यक्षांचा अधिकार आहे. सभागृह जत्रा नाही. इथे नियमांनुसार बोलावे लागते. नियमांचे उल्लंघन झाल्यास अध्यक्षांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. काही सदस्य नियमांनुसार चर्चा करण्याऐवजी सभागृहात गोंधळ निर्माण करत आहेत. नियमांचे पालन केले नाही तर माईक बंद होतो आणि तसे होणे स्वाभाविक आहे. अध्यक्षांच्या निर्णयावर असहमती व्यक्त करणे शक्य आहे, मात्र त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही,असेही शाहांनी म्हटले.
तसेच सभागृहात भाषण करताना प्रत्येक सदस्याने अध्यक्षांच्या माध्यमातून बोलणे अपेक्षित असते. नियमांचे उल्लंघन झाल्यास अध्यक्षांना इशारा देणे, सदस्याचे नाव नोंदवणे, निलंबित करणे किंवा गंभीर गोंधळाच्या परिस्थितीत सभागृह स्थगित करण्याचे आणि असंसदीय शब्द काढून टाकण्याचा अधिकार अध्यक्षांकडे आहे. विरोधकांनी प्रस्तावावर गंभीर चर्चा करण्याऐवजी सभागृहाचे कामकाज विस्कळीत करण्याचा प्रयत्न केल्या आहे, असे अमित शाह म्हणाले.




