नवी दिल्ली | New Delhi
निवडणूक आयोगाची ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित गोंधळाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. आज (रविवार दि.०१ नोव्हेंबर) रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या महारॅलीचे आयोजन करून विरोधकांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले आहे.
खर्गे यांच्या निवासस्थानावरून खुल्या बसमध्ये नेत्यांची एन्ट्री
रॅलीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, केरळचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया, के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि प्रियंका गांधी यांच्यासह २३ पक्षांचे प्रमुख नेते येथे उपस्थित होते. या बैठकीनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांसारखे दिग्गज नेते एका खुल्या बसमध्ये (Open-Top Bus) स्वार होऊन रामलीला मैदानाकडे रवाना झाले. नेत्यांच्या या खास एन्ट्रीने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह भरला.
भाजपकडून दुकानदारांचे नुकसान;राहुल गांधींचा आरोप
रॅलीस्थळाकडे जाताना राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला. आम्ही रॅलीत येणाऱ्या कार्यकर्त्यांना कनॉट प्लेस परिसरात खरेदी करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून स्थानिक दुकानदारांना फायदा होईल. मात्र भाजपने जबरदस्तीने सर्व दुकाने बंद करायला लावल्याचे समोर आले आहे. भाजप स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दुकानदारांचे नुकसान करत असल्याचे देश पाहत आहे,अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात ‘जनमहाभियोग’
निवडणूक आयोगाने राबवलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेत देशातील सुमारे १३.२ ते १३.३ कोटी मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. रॅलीच्या आदल्या दिवशी विरोधकांनी ‘प्रतिसंसद’ (Mock Parliament) भरवून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘जनमहाभियोग’ प्रस्ताव मंजूर केला होता. मुख्य निवडणूक आयुक्तांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी विरोधकांनी या महामोर्चातून लावून धरली आहे.
रामलीला मैदान खचाखच; दिल्लीत कडक बंदोबस्त आणि वाहतुकीत बदल
सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या रॅलीसाठी देशभरातून आणि विशेषतः डाव्या पक्षांचे हजारो समर्थक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून रॅलीस्थळी दाखल झाले. १० लाखांहून अधिक लोक उपस्थित राहिल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी ४,००० ते १०,००० पोलीस कर्मचारी, २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवली आहे. तसेच राजघाट, दिल्ली गेट, आयटीओ, अजमेरी गेट आणि रणजित सिंग फ्लायओव्हर या प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे.
भाजपचा ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेने पलटवार
विरोधकांच्या या महामोर्चाला उत्तर म्हणून सत्ताधारी भाजपने आणि महायुतीने ठाण्यासह विविध ठिकाणी ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा काढली. काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी देशात खोटेपणा पसरवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला आहे.




