मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोट्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या (Rajyasabha) एका जागेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून पुनरागमन केल्यामुळे ही जागा रिक्त झाली असून, शनिवारी (आज) या जागेबाबत पक्षाकडून महत्त्वाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
आज (शनिवारी) सकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभेच्या नावांबाबत चर्चा झाली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि स्वतः छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राज्यसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत चर्चा केली. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे आता भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.
समीर भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात संधी?
दरम्यान, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे केंद्रात (राज्यसभेत) जाण्यास तयार असले, तरी त्यांनी राज्यात आपल्या वाट्याचे मंत्रिपद आणि आमदारकी कुटुंबातच राहावी, असा आग्रह धरल्याचे समजते. केंद्रात स्वतः छगन भुजबळ आणि राज्यातील त्यांच्या जागेवर समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे.
येवल्यात पोटनिवडणूक लागणार?
छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) येवला मतदारसंघात (Yeola Constituency) पोटनिवडणूक लागेल. या निवडणुकीसाठी भुजबळ यांच्याकडून त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. त्यामुळे आता छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळते का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा आणि पक्षात अस्वस्थता
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापासूनच छगन भुजबळ हे या जागेचे प्रबळ दावेदार होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना या जागेवरून संधी दिली जाऊ शकते, अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने राणा यांनी पक्षात प्रवेश करावा, अशी अट घातल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे.




