मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) त्यांच्या ठाणे येथील ‘नंदनवन’ निवासस्थानी भेट घेतली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले होते. त्यावेळी प्रचारादरम्यान ठाकरे बंधूंनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली होती.
यानंतर महापौर निवडणुकीवेळी (Mayor Election) कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना-मनसेचे सूर जुळले होते. तर नाशिकमध्ये (Nashik) देखील मनसेच्या एकमेव नगरसेविकेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता शिंदे आणि ठाकरेंची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागील अधिकृत कारण समोर आलेले नाही. याआधी देखील राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी, बैठका झालेल्या आहेत. पण ठाकरे बंधूंची (Thackeray Brothers) युती झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता या दोघांत नेमकी कोणती चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





