मुंबई । Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेवर अत्यंत आक्रमक पवित्रा घेत हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.
नाना पटोले यांनी एका पत्रकार परिषदेत या अपघातातील तांत्रिक बाबींवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. “हा अपघात आहे की घातपात, हे स्पष्ट होण्यासाठी विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. विशेषतः ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलण्यात आला, असा सवाल त्यांनी विचारला आहे. कोणाच्या आदेशानुसार हा बदल झाला आणि जो नवीन पायलट नियुक्त केला गेला, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती, याचा शोध घेतल्याशिवाय सत्य समोर येणार नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे.
संबंधित विमान कंपनीचा मालक रोहित सिंग याच्यावरही पटोले यांनी कडाडून टीका केली. अपघातासारखी मोठी घटना घडल्यानंतर रोहित सिंग तातडीने परदेशात का पळून गेला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “जर लपवण्यासारखे काही नव्हते, तर त्याने देश का सोडला? केंद्र सरकारने त्याला तातडीने भारतात आणून त्याची कडक चौकशी करायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली. गुन्हेगारांना परदेशात पळू देणे आणि त्यांना अभय देणे ही केंद्र सरकारची परंपराच बनली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीचा संदर्भ देत पटोले यांनी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांवर आपला विश्वास नसल्याचे सांगितले. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा तपास अद्यापही प्रलंबित असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. तसेच गोव्यातील क्लबमधील स्फोटाचा आरोपीही परदेशात पळाला आणि त्यावर काहीच कारवाई झाली नाही, असे सांगत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
यावेळी नाना पटोले यांनी पवार कुटुंबातील अंतर्गत वादावरही भाष्य केले. “पवार कुटुंब एकत्र असावे हीच आमची आणि काँग्रेसची भूमिका आहे. परंतु, दिल्लीतील सत्ताधारी नेत्यांना हे कुटुंब एकत्र आलेले नको आहे. राजकीय स्वार्थासाठी या कुटुंबात जाणीवपूर्वक फूट पाडली जात असून त्यांना एकमेकांपासून विलग ठेवण्याचे राजकारण सुरू आहे,” असे विधान त्यांनी केले. सध्याचे सरकार द्वेषपूर्ण भावनेतून काम करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. घटनात्मक पदाची शपथ घेताना कोणाबाबतही आकस न ठेवण्याची ग्वाही दिली जाते, मात्र हे सरकार मुस्लिम आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवत आहे, जे लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.





