मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताभोवतीचे संशयाचे धुके अद्याप कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नव्या खुलाशाचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणातील काहींना वाचवलं जात असल्याचा दावा गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार करत आहेत. अशातच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले असून याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “अजितदादांच्या अपघात / घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?” असा थेट प्रश्न या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे.
‘मफलरवाल्या’ नेत्याचा चेहरा कोण?
अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात यापूर्वी बोलताना रोहित पवार यांनी ‘मफलर’ हा केवळ एक संदर्भ असून त्यामागे एक चेहरा असल्याचे म्हटले होते. संबंधित चेहरा एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा असल्याचा त्यांचा दावा आहे. या नेत्याने संबंधित विमान कंपनीला किंवा तिच्याशी संबंधित व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर १६ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार कोणाचे नाव घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पडसाद : नाशिकचा श्वास गुदमरतोय…
१६ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. तपास अपेक्षित दिशेने आणि वेगाने होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी, विमान कंपनीचे व्यवहार आणि अपघाताच्या अंतिम क्षणांशी संबंधित मुद्दे पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. यापूर्वी १४ किंवा १५ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेण्याचे संकेत दिले गेले होते. मात्र, आता १६ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेचे बॅनर समोर आल्याने नव्या तारखेकडे लक्ष वेधले गेले आहे.
अजितदादांच्या अपघात/घातपातासंदर्भात अनेक गोष्टींचा उलगडा करणारी महत्त्वाची पत्रकार परिषद सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घेणार आहे.
स्थळ – यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई.
#AjitDadaPawar https://t.co/SwCYuTcSJR— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 14, 2026
येत्या 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता कोणता ‘राजकीय बॉम्ब’ फुटणार, असा उल्लेखही या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता मफलरवाला नेता कोण आणि यामागे नेमके कोण आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
१६ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आणखी काय खुलासा करणार आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत कोणती नवीन माहिती उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मफलर घातलेल्या व्यक्तीच्या चित्रातून कोणाला लक्ष्य करण्यात आले आहे, याचे उत्तरही आता 16 नोव्हेंबरलाच मिळण्याची शक्यता आहे.




