नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
काल (सोमवारी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे हरियाणातील (Haryana) यमुनानगरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी एका सभेला संबोधित केले. तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यात एका खास व्यक्तीची भेट घेतली. तसेच त्याच्या पायामध्ये स्वतः बूट देखील घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे कौतुक होत असून राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यमुना नगरमध्ये कार्यकर्ता असलेल्या रामपाल कश्यप (Rampal Kashyap) यांच्या पायामध्ये बूट घातला. रामपाल कश्यप यांनी जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत नाहीत आणि जोपर्यंत माझी त्यांच्याशी भेट होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी शपत घेतली होती. गेल्या १४ वर्षांपासून कश्यप हे अनवाणी पायांनी काम करत होते. अखेर काल (सोमवारी) त्यांची मोदी यांच्याशी भेट झाली. यानंतर रामपाल कश्यप यांनी पंतप्रधानांच्या हस्ते बूट घालून घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक असलेले रामपाल कश्यप हे हरयाणामधील कैथल जिल्ह्यातील (Kaithal District) रहिवासी आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी भेटत नाहीत तोपर्यंत पायामध्ये चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला होता. चौदा वर्षांचा हा अनवाणी राहण्याचा वनवास रामपाल कश्यप यांनी पूर्ण केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कालच्या हरयाणा दौऱ्यावेळी स्वतः भेटून रामपाल कश्यप यांना बूट घालून दिले. तसेच अशा पद्धतीचा निश्चय पुन्हा न करण्याचे आवाहन देखील केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर केला व्हिडीओ शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर रामपाल कश्यप यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आज यमुनानगर येथील जाहीर सभेत मी कैथल येथील श्री रामपाल कश्यप जी यांना भेटलो. त्यांनी १४ वर्षांपूर्वी एक प्रतिज्ञा केली होती – मी पंतप्रधान झाल्यानंतर ते फक्त पादत्राणे घालतील आणि ते मला भेटू शकले. मी रामपाल जी सारख्या लोकांबद्दल नम्र आहे आणि त्यांचे प्रेम देखील स्वीकारतो पण मी अशा प्रतिज्ञा घेणाऱ्या सर्वांना विनंती करू इच्छितो – तुमचे प्रेम मला खूप आवडते… कृपया सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीशी जोडलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा!” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.