मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भगिनी सरोज पाटील (Saroj Patil) यांच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह आदी मान्यवर हजर होते.
यावेळी भाषणादरम्यान बोलतांना आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ‘अजितदादाचं गावकीकडे लक्ष आहे पंरतु, भावकीकडे लक्ष नाही’, असे म्हटले होते. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या भाषणात आमदार रोहित पवार यांना उद्देशून ‘भावकीमुळेच तू आमदार झालास, आपण बॅलेट पेपरवर निवडून आला आहात, जयंत पाटील (Jayant Patil) जरा त्यांना सांगा असे म्हणत रोहित पवार यांच्या वक्तव्याचा अजितदादांनी चांगलाच समाचार घेतला होता. याच विधानावरून भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
राम शिंदे म्हणाले की, “अजित पवार हे वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबतीत भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटले. तसेच अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करून शिळ्या कडीला उत का आणत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) झाल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवारांची सातारा जिल्ह्यातील कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर भेट झाली होती. त्यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांना ‘थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय झालं असतं’ असे म्हटले होते. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देतांना राम शिंदे यांनी अजित पवारांनी युतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादीची मदत झाली नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे रोहित पवारांचेच काम करत होते असा आरोप केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा अजितदादांनी असेच एक विधान केल्याने ते राम शिंदेंच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.




