नवी दिल्ली | New Delhi
बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीचा (By-Election) निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, ३० वर्षांपासून वर्चस्व असलेला बांकीपूर विधानसभा मतदारसंघ गमवावा लागला आहे. या मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर (Prashant Kishor) विजयी झाले आहेत. तर मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस आणि गुजरातमधून भाजपचा उमेदवार निवडून आला आहे.
भाजपचे ३० वर्षांचे वर्चस्व संपुष्टात
बांकीपूर विधानसभा मतदारसंघ (Bankipur Assembly Constituency) १९९५ पासून म्हणजेच सलग ३० वर्षे भारतीय जनता पक्षाचा (BJP) मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. प्रथम नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी या जागेचे प्रतिनिधित्व केले.२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्यसभेत गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी ३० जुलै रोजी ३४.३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची धाकधूक वाढली होती. अखेर या निवडणुकीत प्रशांत किशोर विजयी झाले आहेत.
ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देण्यासाठी
दरम्यान, बांकीपूरमधून विजय मिळविल्यानंतर माध्यमांशी बोलताना किशोर म्हणाले की,”ही निवडणूक आमदार निवडण्यासाठी नव्हे तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला, एका चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याचा संदेश देण्यासाठी आहे. जनतेने तुमचे २०२ आमदार निवडून दिले आहेत. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला किंवा वाईट चारित्र्याच्या व्यक्तीला बिहारचे नेतृत्व करू देऊ नका. बिहारला एका चांगल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. बिहारमध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत, जेणेकरून इथल्या तरुण मुलांना आणि भावी पिढीला कामासाठी राज्याबाहेर भटकावे लागणार नाही. हाच ठाम संदेश बांकीपूरच्या जनतेने या निवडणुकीतून दिला आहे”, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.
हे देखील वाचा : By-Election Result Update : बिहार, मध्यप्रदेशात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता; नितीन नबीन यांच्या गडाला प्रशांत किशोर भगदाड पाडणार?
जनतेचे मानले आभार
किशोर यांनी “ज्या नागरिकांनी मला मतदान केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांना मी हेच सांगेन की त्यांचा विश्वास आणि पाठिंबा जिंकण्यासाठी मी यापुढे अधिक मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न करेन. बिहारला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि बिहारमध्ये बदल झालाच पाहिजे” असे म्हटले आहे.
किती मतांनी विजयी झाले?
प्रशांत किशोर यांनी १९ हजार २४६ मतांनी भाजप उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा पराभव केला आहे. किशोर यांना ६३ हजार ९४६ तर सिन्हा यांना ४४ हजार ७०० मते मिळाली आहेत. तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या रेखा गुप्ता यांना १४ हजार २४१ मिळाली.
मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कुणाची बाजी?
मध्यप्रदेशातील दातिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) घनश्याम सिंह विजयी झाले असून, त्यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा पराभव केला आहे. सिंह यांना ६६ हजार ७५७ तर तिवारी यांना ६० हजार ७४१ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसचे घनश्याम सिंह ६ हजार ०१६ मतांनी निवडून आले. तसेच गुजरातमधील (Gujarat) मांजलपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सतेंद्र भाई पटेल ३० हजार ६३० मतांनी विजयी झाले असून, त्यांना ५५ हजार ४८१ इतकी मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार भिकीमभाई राबरी यांना २४ हजार ८५१ इतकी मते मिळाली आहेत.




