मुंबई | Mumbai
नोव्हेंबरच्या मध्यात महाराष्ट्रात थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. पहाटे आणि रात्री जाणवणाऱ्या गारव्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे बाहेर काढले आहेत. विशेष म्हणजे, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिकमध्ये तापमानाचा पारा खाली घसरला आहे. रविवारी (१५ नोव्हेंबर) नाशिक शहरात किमान १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वरचे तापमान १४.६ अंशांवर होते. दरम्यान, राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, पहाटेचा गारठा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या अकबन चक्रीवादळाचा परिणाम आता राज्यातील हवामानावर जाणवायला लागला असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होताना दिसत आहे. हवामान विभागाने 19 नोव्हेंबरच्या आसपास विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज नसला, तरी चक्रीवादळाच्या दिशेनुसार हवामानात बदल होऊ शकतो, असा अंदाज आहे.
दिवसा उकाडा रात्री थंडी
राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. पण, रात्रीच्या वेळी आणि पहाटे किमान तापमानात घट होत असल्याने वातावरणात गारवा वाढला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असून, बहुतांश जिल्ह्यांत कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.
संपादकीय : १६ नोव्हेंबर २०२६ – इस्त्रायलमध्ये राजकीय समीकरणांची कसोटी!
पुण्यात सर्वात कमी तापमान
राज्यात पुणे येथे राज्यातील सर्वात कमी 12.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर तिकडे, नाशिककर देखील थंडीने गारठले असून नाशकात तापमान 12.6 अंशावर पोहचले आहे. यंदा रविवारी हंगामातील आतापर्यंतच्या निचांकी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे देखील वातावरणात गारवा जाणवत आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह कोकणात उष्ण व कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 33 अंश, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. दिवसा उकाडा जाणवत असला, तरी रात्री आणि पहाटे वातावरण काहीसे थंड राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा उष्णता आणि रात्री गारवा अशा दुहेरी हवामानाचा सामना करावा लागू शकतो.
निफाडमध्ये पारा ११.५ अंशांवर
उत्तर भारतातून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही थंडीचा प्रभाव वाढत आहे. नाशिकपेक्षा कमी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राच्या आकडेवारीनुसार, निफाड येथे किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. निफाड परिसरात यापूर्वीही हिवाळ्यात कमी तापमानाची नोंद होत असते. द्राक्ष उत्पादक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात तापमानातील घसरणीकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
कमाल किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये किमान तापमान पुढील काही दिवस १२ ते १३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, १६ नोव्हेंबरच्या हवामान अंदाजानुसार पुणे, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर परिसरात पहाटेच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही पहाटे आणि रात्री तुलनेने कमी तापमान जाणवू शकते. विदर्भात पहाटेच्या तुलनेत रात्री गारवा अधिक जाणवण्याचा अंदाज आहे.




