नागपूर | Nagpur
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी झाल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी पुरावे देखील दाखवले. यावरून देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी
विधानसभेच्या २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून आणण्याची गॅरंटी दिली होती. मात्र,निवडणूक आयोगाबाबत (Election Commission) शंका नसल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्या दोन लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत देखील घालून दिली होती. पंरतु, आम्ही दोघांनी जनतेत जाऊन जो कौल मिळेल तो स्वीकारण्याचे ठरवून त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता”, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
दरम्यान, या गौप्यस्फोटामुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण याची जोरदार चर्चा राजकीय (Political) वर्तुळात सुरू झाली आहे. या दोन माणसांनी दोघांना नेमकी कोणती ऑफर दिली होती. तसेच ही माणसे कोण होती, त्यांचा निवडणूक आयोग अथवा मतदान प्रक्रियेशी काय संबंध होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
शरद पवारांनी केला उद्धव ठाकरेंचा बचाव
यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार म्हणाले की, “राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्याला मी हजर होतो. मी कालपासून बघतोय, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुठे बसले? यावर चर्चा सुरु आहे. ज्यावेळेला प्रेझेंटेशन बघायचे म्हटल्यावर सिनेमा बघताना ज्याप्रमाणे आपण पहिल्या रांगेत बसत नाही, आपण पाठीमागे बसतो त्याच पद्धतीने मी स्वत:आणि फारुख अब्दुल्ला शेवटी बसलेलो. आमच्याजवळ उद्धव ठाकरे होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते” असे म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा बचाव केला.
दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊद्या
यावेळी बोलतांना शरद पवारांनी राहुल गांधी यांनी मांडलेल्या मत चोरीच्या मुद्द्याला देखील समर्थन दिले. ते म्हणाले की, “निवडणूक आयोगाला जर राहुल गांधी यांच्यावर आक्षेप असेल तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपावर दूध का दूध आणि पानी का पानी करावे असे आव्हान शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिले. तसेच आता मत चोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.





