मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत (Shivsena party and Symbol) सुप्रीम कोर्टात अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी (Hearing) आता अंतिम टप्प्यावर आली आहे. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी बुधवारी (दि.८) अंतिम सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षासाठी ही शेवटची आशा आहे. निकाल त्यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणार आहे. राज्याच्या राजकारणावर त्याचे आमूलाग्र असे बदल पडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे आणि त्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले की, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मूळ शिवसेनेचे आहे. ते हिरावण्यात आले आहे. संविधानिकदृष्ट्या जी चोरी झाली आहे ती पूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणात निर्णय न झाल्यामुळे सत्तास्थानी असतात. याचा अर्थ ते बरोबरच आहेत, संविधानिकदृष्ट्या योग्य आहेत असे होत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना द्यायचे, याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. त्यांनी ते परत दिले तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर त्यांनी गोठवले तरी चालेल, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) वतीने यावर प्रत्युत्तर देण्यात आले असून बाळासाहेबांचे विचार व हिंदूत्व आमच्यासोबत असल्याने आतापर्यंत आम्ही यशस्वी ठरलो असून सर्वोच्च न्यायालयाकडून (Suprme Court) ही शिवसेना हे नाव व धनुष्यबाण यावर शिक्कामोर्तब होईल, असे म्हटले होते.





