मुंबई | Mumbai
दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) तर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. वाढत्या दबावानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना टायफाईड झालेला असतानाही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, या भूमिकेवर तरुण ठाम राहिले. सरकारने आंदोलन मागे घेण्यासाठी विविध प्रयत्न केले, मात्र तरुणांच्या एकजुटीपुढे सरकारला माघार घ्यावी लागली. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला असला तरी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेले नाही. जोपर्यंत आपल्या इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे दीपके यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंकडून (Thackeray Brothers) देखील उद्या (रविवारी दि.२६ जुलै) रोजी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मात्र आता सरकारने प्रधान यांचा राजीनामा (Resign) घेतला असल्याने ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या मोर्चाबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात ठरल्याप्रमाणे भव्य मोर्चा व व्यासपीठ आयोजित केले जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “देशात अस्वस्थतेचे वातावरण आहे. सरकारला (Government) न घाबरता मैदानात उतरलेले अभिजीत दीपके, तरुण विद्यार्थी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचे मी अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, विद्यार्थिनींशी झालेली गैरवर्तन आणि साध्या वेशातील गुंडांवर काय कारवाई होणार? तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत, यावर गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास हा मोर्चा दिल्लीकडे (गृह मंत्रालयाकडे) वळू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ” या तरुण पिढीने (‘झेन जी’) मस्तावलेल्या सरकारला जमिनीवर आणले आहे. हा तरुणांचा आणि अभिजीत दीपके यांच्या लढ्याचा मोठा विजय आहे. नीट (NEET) पेपरफुटी आणि त्यातील घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या (Suicide) केल्या. ऑस्ट्रेलियातील शिक्षणमंत्र्यांनी स्वतःच्या खात्यातील चुकीमुळे राजीनामा दिला होता. धर्मेंद्र प्रधान यांनीही हा विषय एवढा ताणण्यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. आता तरुणांचा हा राग ‘प्रधानांवरून पंतप्रधानांवर’ गेला आहे. दिल्ली पोलिसांनी बाहेरील माणसे बोलावून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला? दोषी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे. याउलट महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी ही परिस्थिती अत्यंत शांततेने व उत्तम प्रकारे हाताळली, त्याबद्दल त्यांचे आभार’असे त्यांनी म्हटले.
तसेच महाराष्ट्रातून पुढील शिक्षणमंत्री होणार का? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, राजकारणात मोठी स्पर्धा सुरू आहे. नक्की काय होईल हे आताच सांगणे कठीण आहे. तुम्हाला जे कळलं तेवढंच आम्हाला कळलं आहे. तुम्ही महाराष्ट्रातील प्रमुख राजकारणी आहे, तुमचा काय अंदाज आहे, हे आजपर्यंत इतके गेले आहे. त्यांच्यामध्ये खूप स्पर्धा आहे, शिंदे गेले की फडणवीस गेले आहे. आताच या क्षणावर काही बोलण्यासारखं नाही” असे त्यांनी म्हटले.
उद्याचा मोर्चा होणारच
तर मोर्चाबाबत बोलताना ठाकरे बंधू म्हणाले की,” उद्याचा मोर्चा हा नक्की होणार आहे, लोक आपल्या भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत आहे. शुक्रवारी आम्हाला संदेश पाठवला आणि विद्यार्थी जमले होते. या विद्यार्थ्यांची ताकद काय आहे, जनतेला दाखवली पाहिजे म्हणून हा मोर्चा निघणार आहे. जसा ठरवला होता, तसाच निघेल आणि राहील. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये जिथे व्यासपीठ उभारण्यात आले आहे तिथेच तरुणांचा हा मोठा विजय आहे असे त्यांनी सांगितले.




