Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : … अन् उद्धव ठाकरेंनी भाषणात आमदार फारांदेंचा उल्लेख करत...

Uddhav Thackeray : … अन् उद्धव ठाकरेंनी भाषणात आमदार फारांदेंचा उल्लेख करत भाजपला डिवचलं; नाशिककरांना वचनही दिलं, नेमकं काय-काय म्हणाले?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिककरांच्या (Nashik) व्यथा,शहराच्या समस्या आणि लोकशाहीवरील संकट यामुळे जनता त्रस्त झाली आहे. नाशिकला दत्तक घेऊन भकास केले. आता मनपाची सूत्रे शिवसेना-मनसेच्या ताब्यात द्या, मुंबईसारखा (Mumbai) विकास करून दाखवू, असे वचन शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिककरांना दिले.

- Advertisement -

शुक्रवारी (दि.९) शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनपा निवडणुकीची पहिली संयुक्त प्रचार सभा पार पडली. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याने या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

YouTube video player

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. हा ठाकरेंनी दिलेला वचननामा आहे. तो पाळला जाईल हे वचन देतो, असेही ठाकरे म्हणाले. शिवसेनेला (Shivsena) पराभवाचा सामना करावा लागला, मात्र पक्ष खचला नाही. शिवसैनिकांसह पक्षाचे अस्तित्व टिकवून पुन्हा उभे राहिलो आहोत, आता थांबणार नाही, असेही ते म्हणाले. सध्या भाजपातील निष्ठावंतांवर मोठे संकट आलेले आहे. ज्यांना राजकारण जमत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागत आहेत. मात्र या दत्तक मुलांच्या कावड्या भाजपच्या निष्ठावंतांना वाहाव्या लागत असल्याने त्यांच्यात नाराजी दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, नाशिकमध्ये (Nashik) सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर बोलताना राऊत (Raut) म्हणाले, पन्नास हजार कोटींची कामे बाहेरील ठेकेदारांना दिली जात आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराची अवस्था बदलली नाही. पाणी खासगीकरण, ड्रग्सचा प्रश्न, तपोवनातील झाडतोड, बिल्डरधार्जिणी धोरणे आणि सामान्यांच्या घरांवर चालवलेले बुलडोझर यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. नाशिकचा चेहरा बदलण्याची जबाबदारी आमची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ताईंच्या वेदना प्रामाणिक

आ. देवयानी फरांदे या अशा दत्तक सोहळ्यात रडल्या होत्या. त्यांचा त्रागा रास्त होता. त्यांच्या वेदना प्रामाणिक होत्या. प्रत्यक्षात शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचा तुटवडा नसल्याचा प्रत्यय या सभेतून दिसून येत आहे. मोठी माणसे घडवणारे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. निष्ठा सोडून गेलेले आज उपरे झाले असल्याचे ठाकरे म्हणाले.

सत्तेचा गैरवापर

निवडणुका बिनविरोध करण्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक यंत्रणेवर अधिकारांचा गैरवापर होत असताना निवडणूक आयोग काहीच करत नसल्याचा आरोप करत लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले. तपोवनातील वृक्षतोड, भ्रष्टाचार, एफएसआय घोटाळे, खासगीकरणाचे प्रयत्न यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

होय, आम्ही एकत्र आलो आहोत

जी सत्ता तुमच्या विकासासाठी आहे, ती मिळवण्यासाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत, असे ठणकावून सांगत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जे करून दाखवले तेच नाशिकमध्ये करून दाखवू, असा विश्वास मतदारांसमोर व्यक्त केला. सत्ता दिली तर महापालिका शाळा, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक प्रवास सेवा सक्षम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपले नाशिक आपल्या हातात ठेवण्यासाठी मतदान करा, कोणी दत्तक बाप येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मशाल, इंजिनला ऊर्जा देण्याचे काम

यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मशाल आणि इंजिनला ऊर्जा देण्याचे काम मराठी बांधव, मनसे सैनिक आणि शिवसैनिक करत असल्याचे ते म्हणाले. पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये होत आहे, यालाच नाशिकचे महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नाशिक ही क्रांतिकारकांची भूमी असून येथील प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या