Wednesday, July 29, 2026
Homeमुख्य बातम्याUddhav Thackeray : "राम मंदिराच्या नावाखाली धंदा सुरू, ही तर हिंदुत्वाशी..."; परभणीत...

Uddhav Thackeray : “राम मंदिराच्या नावाखाली धंदा सुरू, ही तर हिंदुत्वाशी…”; परभणीत उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेंवर घणाघात

परभणी | Parbhani

ठाकरे गटाच्या (Thackeray Group) सहा खासदारांनी बंडखोरी (Rebel MP) करत काही दिवसांपूर्वी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. यानंतर उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवारी) परभणी दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, “राम मंदिर हे आमचे दैवत आणि श्रद्धास्थान आहे, पण त्यांनी तिथे दुकान उघडून रामाच्या नावाखाली धंदा सुरू केला आहे,” असा बोचरा टोला उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील दानपेटी अपहारप्रकरणावरून भाजपला लगावला.

देशात आणि राज्यात कुठेही संतोष नाही

राज्यातील आणि देशातील सद्यस्थितीवर बोट ठेवत उद्धव ठाकरे म्हणाले, “देशाच्या कोणत्या राज्यात आज संतोष आहे? कोणत्याच नाही. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना मी लोकांसाठी जे करायचे ते प्रामाणिकपणे करत होतो. दुर्दैवाने गद्दारी करून आमचे सरकार पाडण्यात आले. यांना आमचे चांगले काम बघवले नाही. आता राज्यात केवळ मराठा विरुद्ध मराठा असे भांडण लावून द्यायचे आहे, प्रश्न सोडवायचे नाहीत. रोज कुठे पेपर फुटत आहेत, तर कुठे खासदार फुटत आहेत. कालच टीईटीचा पेपर फुटला. राज्यात सगळा अंधाधुंद कारभार सुरू असून कोणीही आनंदी नाही”, असेही त्यांनी म्हटले.

कारसेवकांचे बलिदान कशासाठी? ‘त्या’ चोरीवर चौफेर टीका

राम मंदिर आंदोलनाचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, “कारसेवकांनी जीव दिला, घरदार सोडले, गोध्रा कांड झाले, हे सर्व कशासाठी झाले? राम मंदिर उभे राहावे म्हणूनच ना? पण आज मंदिराच्या आडून जे धंदे चालले आहेत ते अत्यंत घृणास्पद आहेत. ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणणारे आज काय करत आहेत हे जनतेला दिसत आहे. आमदार-खासदार फोडण्यावर मतदार काय तो निर्णय घेतीलच, पण राम मंदिरातून जी चोरी झाली आहे, ती थेट हिंदू आणि हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

…म्हणून मतदारांची माफी मागण्यासाठी आलोय

परभणी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “या केवळ सभा नाहीत, तर मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे. परभणीकरांनी शिवसेनेला नेहमीच साथ दिली, महापौर दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या खासदाराला विजयी केले, त्यांची माफी मागण्यासाठी मी आलो आहे; कारण निवडून आलेले लोक गद्दारी करतात, पण मतदार आणि शिवसैनिक मात्र कायम शिवसेनेसोबतच प्रामाणिक राहिले आहेत, असे त्यांनी म्हटले.

ते खासदार निधीसाठी नव्हे, तर खासगी निधीसाठी गेले

खासदार संजय जाधव यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर थेट निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, “ते खासदार निधीसाठी गेले असे सांगत असले, तरी प्रत्यक्षात ते ‘खासगी निधी’साठी गेले आहेत. त्यांनी खासदार निधी कसा आणि किती खर्च केला, हे सर्वांना माहीत आहे. संसदेत त्यांनी मतदारसंघाच्या प्रश्नांवर किती वेळा तोंड उघडले आणि मंत्र्यांकडे किती पाठपुरावा केला, याचा हजेरीपट आमच्याकडे आहे. मी जर आधीच लक्ष दिले असते, तर यांच्या बऱ्याच भानगडी बाहेर काढल्या असत्या”, असे त्यांनी सांगितले.

गद्दार शिरोमणी मुंबईत, ही कीड ठेचली पाहिजे

“आता केवळ वरवरचे उपाय करून चालणार नाही, तर गद्दारीच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. गद्दार शिरोमणी मुंबईत बसला आहे (मिंधे सेना). लोकांनी अशा गद्दारांच्या उमेदवारांना निवडणुकीत ठरवून पाडले पाहिजे. ही गद्दारीची कीड जर आताच ठेचली नाही, तर देशातील लोकशाही वाचणार नाही. काही लोकांनी तर चक्क आईची शपथ घेतली होती, आता त्यांना या शपथेचे दुष्परिणाम नक्कीच दिसतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरही भाष्य

भाजप आणि महायुतीमधील अंतर्गत वादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हे जे काही सुरू आहे त्याला ‘ऑपरेशन टायगर’ नाव दिले असले, तरी हे ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे का? अशी शंका येते. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाऊ द्यायचे नसेल किंवा त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचे नसेल, म्हणून ही त्यांच्याच अंतर्गत गटबाजीची खेळी असू शकते”, असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ जुलै २०२६ – ग्राहक हक्कांची डिजिटल चळवळ

0
वाढती महागाई, तांत्रिक आव्हाने आणि शासकीय पातळीवरील धोरणात्मक निर्णय जेव्हा थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागतात, तेव्हा असंतोष व्यक्त करण्याचे...