Tuesday, April 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराजकारण : आता मात्र हद्द झाली!

राजकारण : आता मात्र हद्द झाली!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

खरातपाठोपाठ पत्रकार रवींद्र एरंडे याच्या लैंगिक शोषणाच्या भानगडी बाहेर आल्याने नाशिकच्या बदनामीत भर पडली आहे. या एरंडे फाईल्स व्हायरल होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतल्याने आंबट शौकिनांच्या मनोरंजनाचे साहित्य बनू शकले नाही. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाच्या मीडियात नाशिकचे नाव ‘कूप्रसिद्ध’ झाले. एरंडेंना वर्षानुवर्षे ओळखणार्‍यांची तर मती गुंग झाली आहे.

आता मात्र हद्द झाली. नाशिककरांना आणखी किती बदनामीला सामोरे जावे लागणार, हे कळत नाही. भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरणात दररोज नवनव्या भानगडी बाहेर येत असतानाच आता पत्रकारितेच्या बुरख्याआड लैंगिक शोषणाचा उद्योग करणार्‍या चमडीचोराला पोलिसांनी बेड्या घातल्याने केवळ पत्रसृष्टीच नव्हे तर प्रत्येक संवेदनशील नाशिककरही मनापासून हादरला असेल. नाशिकच्या तुलनेने लहान असलेल्या पत्रसृष्टीत कुठे खुट्ट वाजले तरी प्रत्येकाला कळते. असे असताना या महाभागाचे चाळे गेली कित्येक वर्षे गपगुमान सुरू होते, हे पोलिसांच्या दप्तरी दाखल झालेल्या काही व्हिडिओंवरून कळले. पत्रकारांनाही सुगावा लागू न देता वर्षानुवर्षे महिलांचे लैंगिक शोषण करतानाच समाजकारणात मात्र निर्भिड, संवेदनशील पत्रकार म्हणून मिरविण्याचा निगरगट्टपणा या व्यक्तीच्या ठायी कसा आला, याचेच आश्चर्य वाटते. सातपूर आणि रवींद्र एरंडे हे समीकरण गेली किमान तीस-चाळीस वर्षे तरी लोकांना परिचित आहे.

नाशिकच्या स्थानिक दैनिकात पत्रकारितेची सुरुवात करून त्या जोरावर नामचीन झाल्यानंतर स्वत:चे साप्ताहिक व नंतर चॅनलही सुरू करून एक यशस्वी स्टार्टअपवाला म्हणून एरंडेने नावलौकिक मिळविलेला होता. त्यामुळेच महिलांच्या लैंगिक शोषणात त्याचे नाव आल्यानंतर प्रथमदर्शनी अनेकांना धक्का बसला. अजूनही अनेक जण एकमेकांना फोन करून हे कसे शय आहे, रवीला कोणी न केलेल्या गुन्ह्यात अडकविले तर नाही ना, असे जेव्हा विचारतात तेव्हा त्याच्या विषयीच्या या धक्कादायक घटनेविषयीचे आश्चर्यच शिगोशिग भरलेले दिसते. त्यामुळेच नाशिककरांना आणखी काय काय पाहावे, ऐकावे अन् नंतर भोगावे लागणार, असा प्रश्न पडतो.

राजकीय पुढार्‍यांच्या लीला कोठे ना कोठे सुरूच असतात आणि त्याला पायही फुटत असल्याने त्याची चर्चा गावभर होतच असते; परंतु नाशिकच्या इतिहासात कदाचित प्रथमच एक प्रथितयश माध्यमकर्मी अशा घाणेरड्या उद्योगात गुंतल्याचे पाहावयास मिळाले असेल. यापूर्वी माध्यम क्षेत्रातील काहींच्या कारनाम्यांची चर्चा जरूर झाली; पण असल्या थराला कोणीही कधी गेले नव्हते. चिरीमिरीपलीकडे जाण्याचा मस्तवालपणा फारसा कधी कोणी दाखविला नाही. ज्यांनी ही सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला ते मुख्य प्रवाहातून बाहेर पडल्याचीही उदाहरणे आहेत. अशांनी नंतर लंगोटीपत्र किंवा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जिवंत राहण्याचा प्रयत्न जरूर केला; पण त्यांना ती पूर्वीची विश्वासार्हता काही लाभली नाही.

नाशिककरांना पत्रकारांचे नेहमीच एक संवेदनशील, समाजशील आणि पारदर्शी रूप बघायला मिळाले आहे. शहराच्या असंख्य बुनियादी विषयांवर स्थानिक माध्यमांनी सतत जागल्याची भूमिका निभावली आहे. ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ हे तत्त्व जपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत ‘देशदूत’ने तर स्पष्ट भूमिका घेत डॉ. वसंतराव गुप्ते यांना निवडून आणले होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनातही ‘देशदूत’चे तत्कालीन संपादक सुरेश अवधूत यांनी भाग घेत शेतकरी हिताच्या प्रक्रियेत झोकून दिले होते. आज पत्रकारांनी अशा भूमिका घ्याव्या की नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत.

पण त्याकाळी स्वच्छ, स्पष्ट अशी समाजहिताची भूमिका घेऊन ‘देशदूत’च्या मालकांसह संपादकीय चमूनेही काम केल्याचा इतिहास आहे. काही प्रसंगी त्याचा त्रासही सहन केला. पण घेतलेला वसा टाकला नाही. उतणार नाही, मातणार नाही हे मूल्य उराशी बाळगूनच त्याकाळात केवळ ‘देशदूत’च नव्हे तर अनेक वर्तमानपत्रांनी पत्रकारिता केली. आजही स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब पोतनीस, शशिकांत टेंबे, शरद बुरकुले, मधुकर कावळे, नरहरी भागवत, चंदुलाल शहा, सुधाकर पंडित, हेमंतराव कुलकर्णी, उत्तमराव कांबळे, सुरेश भटेवरा अशा असंख्य पत्रकारांच्या सकारात्मक, विवेकी व सजग पत्रकारितेचा आठव केला जातो, तो त्यांच्या विश्वासार्हतेमुळेच. सुदैवाने माध्यमसृष्टीतही चांगुलपणाची रेष मोठी असल्याने नाशिकची पत्रसृष्टी कधी बदनाम झाली नव्हती. रवींद्र एरंडे यांच्या चाळ्यांनी आता ती कमीदेखील पूर्ण झाली, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

कोण आहे हा रवींद्र एरंडे, त्याच्यासाठी एवढी जागा का वाया घालवता, असा प्रश्नही काहींना पडू शकतो. पण समाजातील अशी कीड समूळ नष्ट करण्यासाठी, हे त्याचे आमच्यातर्फे उत्तर असू शकते. अशी माणसे, मग ती पत्रकारितेत असली तरी त्यांना उघडे पाडणे आणि त्यांच्या वाईट कृत्याचा समाचार घेणे हीदेखील एक समाजसेवाच आहे, असे म्हणता येईल. संगमनेरमधून कामाच्या शोधार्थ आलेला हा पोटार्थी रवींद्र व्हीआयपी कंपनीत कामाला लागला. तो काळ साधारण नव्वदच्या दशकाचा असेल. मुळातच सर्वसामान्य कुटुंबातील रवींद्र हा तसा चुणचुणीत. सतत धडपड आणि कष्टाळूपणामुळे अल्पावधीतच तो स्थिरावला. कंपनीत असतानाच पत्रकारिताही करावयास लागला. तेव्हा कामगार वर्गासाठी खास बातमीदारी कोणी फारशी करीत नसे. रवी स्वत: कामगार असल्याने त्याने कामगारांच्या अडीअडचणी, समस्या, त्यांच्या जीवनातील ताणेबाणे, सुखदु:ख यांना हात घालायला सुरुवात केली.

तो काळ तसाही कामगार चळवळीचा असल्याने त्याला अल्पावधीत नाव मिळाले. स्थानिक दैनिकात कामगारांसह औद्योगिक बातमीदारीची मातब्बरी मिळाल्यानंतर व्हीआयपीला मुदतपूर्व रामराम ठोकून बहाद्दराने स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरू केली. त्याच दरम्यान पत्नीच्या नावाने ब्यूटी पार्लर सुरू केले. शिवणकाम, ब्यूटीपार्लर अशा घरगुती कामांसाठीच्या अल्पकालीन प्रशिक्षण वर्गाचे प्रमाणपत्र देणारी शासनमान्य इन्स्टिट्यूट काढली. त्या माध्यमातून महिलांचा गोतावळा जमू लागला. आर्थिकदृष्ट्या जम बसल्यानंतर त्याने सन्मानयुग नावाचे साप्ताहिक सुरू केले. पाठोपाठ सन्मान न्यूज १४ हे यूट्यूब चॅनलही सुरू केले. दरम्यानच्या काळात विविध राजकीय नेत्यांच्या प्रचार, प्रसाराचेही काम तो करीत राहिला.

निवडणूक काळात नेत्यांचे कार्यअहवाल प्रसिद्ध करण्याचा उद्योग सुरू करणारा कदाचित तो पहिला वार्ताहर असावा. असे सगळ्या बाजूने उत्तम चालले असतानाच त्याची गाडी घसरलेली दिसते. उपासना केंद्र नावाचा आणखी एक उद्योग सुरू करून हे महाशय वास्तुशास्र, अंकशास्र व फेंगशुईच्या माध्यमातून भोळ्याभाबड्यांना भविष्य कथन करू लागले. कॅप्टन खरात आणि एरंडे यांच्या घटनांमध्ये असे बरेचसे साम्य आढळते. येथपर्यंत ठीक होते. पण महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शोषण सुरू झाले तेव्हा त्याचे हे स्खलन केवळ धक्कादायकच नव्हते तर चीड आणणारेही होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची गाडी अशी रुळावरून घसरली आणि नंतर ती सावरलीच नाही. नीतिभ्रष्ट झाल्यावर जशी माणसाची बुद्धी काम करीत नाही, तसेच याचे झाले. पत्रकारितेत उत्तम करिअर करताना हे असले दळभद्री उद्योग त्याला कसे सुचले हा कळीचा प्रश्न असला तरी मुळातच त्याची वृत्ती ही भोगविलासी असावी व जमीन भुसभुशीत लागल्यावर त्याने कोपराने खणायला सुरुवात करून व्यक्तिगत भ्रष्टतेची परिसीमा गाठली.

खरातच्या नैतिकतेचा खात्मा ज्या त्याच्या सहकार्‍याने केला, अगदी तशाच मोडस् ऑपरेंडीने एरंडेच्या सहायकाने हे वासनाकांड उघडकीस आणले. खरातचा सहायकही त्याला पैशांसाठी धमकावू लागल्यानंतर त्याने एका महिलेस त्याविरोधात तक्रार द्यायला लावली आणि त्याच्या तपासातून राज्यातीलच नव्हे तर देशातील एका महाभयंकर प्रकरणाचा उलगडा झाला. रवींद्र एरंडेच्या बाबतही अगदी असेच घडले. केलेल्या भानगडी रेकॉर्ड करून त्या जतन करून ठेवण्याचा आणखी एक निलाजरेपणा एरंडेच्या ठायी होता. ज्या अर्थी तो महिलांबरोबरच्या संबंधांचे चित्रण करायचा, त्याचाच अर्थ त्याचा हेतू वाईट तर होताच, शिवाय त्यातून त्याची विकृत वासनाही दिसत होती. सहायक पैशांसाठी धमकावू लागल्यावर सुरुवातीला त्याला ते देऊन गप्प करून पाहिले. परंतु त्याची भूक वाढल्यानंतर एरंडेने पोलिसात आपला लॅपटॉप चोरीस गेल्याची फिर्याद दिली. सुदैवाने पोलिसांना चोरांचा तत्काळ सुगावा लागला.

पोलिसांची ही तत्परताही तशी अगम्यच. पण असो, लागलीच चोर हाती लागल्यानंतर त्यांच्याकडील साहित्याची पाहणी केल्यानंतर जे काही हाती लागले त्याने पोलीसच चक्रावले. फिर्यादीला भलत्याच प्रकरणात आरोपी करण्याचा अत्यंत दुर्मिळ असा प्रसंग त्यांच्यावर आला. असंख्य महिलांबरोबरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर यावेळेस पोलिसांनी अधिक दक्षता घेऊन ते व्हायरल होणार नाहीत याची काळजी घेतली. त्यामुळे खरातप्रमाणे या एरंडे फाईल्स आंबट शौकिनांच्या मनोरंजनाचे साहित्य बनू शकले नाही. या प्रकरणातही चौकशीत आणखी काय बाहेर येते ते पाहावे लागेल. परंतु यानिमित्ताने पुन्हा एकदा राज्य आणि देशाच्या मीडियात नाशिकचे नाव ‘कूप्रसिद्ध’ झाले. गेल्या दोन दिवसांपासून असंख्य लोक फोन करून नाशिकला चाललंय तरी काय, असा सवाल करीत आहेत. एरंडेंना वर्षानुवर्षे ओळखणार्‍यांची तर मती गुंग झाली असून ते एकमेकांना फोन करून खातरजमा करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

साळसूदपणाचा आव आणून असले वाईट चाळे करणारा कधीकाळी आपल्या सोबत पत्रकारितेचे धडे गिरवित होता याचा आठव झाला तरी किळस यायला लागते. आता मात्र हद्द झाली, या वायाने लेखाची सुरुवात केली ती त्यासाठीच. आता नाशिककरांना आणखी काय पाहायचे, ऐकायचे बाकी राहिले आहे, असे वाटते. सिंहस्थ पर्वात जगभरातील लोक गोदावरीत डुबकी मारून पावित्र्याचा अनुभव घ्यायला लाखोंच्या संख्यने येतात. या डुबकीत पापक्षालनाचीही ताकद असल्याचा भाबडा समज काहींचा आहे, तसे असेलच तर आता गोदामाईने समस्त नाशिककरांनाच सचैल स्नान घालावे आणि या बदनामीच्या कोपातून मुक्त करावे, ही प्रार्थना.

ताज्या बातम्या

उमराणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक

0
उमराणे | वार्ताहर Umrane येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग सहा दिवसांच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाल्याने गत दोन दिवसापासून विक्रमी...