छ. संभाजीनगर | Chhatrapati SambhajiNagar
राज्यातील २२ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता, आता तिथे अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते तसेच उमेदवार नाराज झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. ज्या ठिकाणच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहे तिथे आता २० डिसेंबरला मतदान होईल आणि २१ तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे २ डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही स्वतंत्र सभा आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत हा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा वेळी कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल असे आजपर्यंत कधीच झाले नाही.’
आम्ही रिप्रेझेंटेशन निवडणुक आयोगाला देऊ
या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणे अत्यंत चुकीचे आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचे आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असले तरीही अशाप्रकारे निर्णय घेणे चुकीचेच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
अशा प्रकारे निवडणुक पुढे ढकलणं चुकीचे आहे
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ‘निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. जेवढा मी कायदा बघितला माझा अभ्यास आहे वकिलांसोबत बोललो त्या सगळ्यांच्या मतानुसार असे कुणीही न्यायालयात गेले तर निवडणुका रद्द होत नाही. निलंग्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले होते तो न्यायालयात गेला. त्याचे नामनिर्देशन रद्द झाले, मग अशावेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांना प्रचाराचा वेळ मिळाला, अर्ज परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, कुणीतरी पार्टी केली म्हणून निवडणूक पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे.’
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




