पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
ड्रीम कॅसल ते मखमलाबाद गाव तसेच सुयोजित गार्डन ते मखमलाबाद गाव या मार्गावरील खड्डेमुक्ती व काँक्रीटीकरणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.१८) जिजाई फाऊंडेशनचे प्रमोद पालवे यांच्या नेतृत्वाखाली फडोळ मळा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
मुख्य रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळी ११ वाजता रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन छेडले.
आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या पंचवटी विभागाचे बांधकाम उपअभियंता नितीन राजपूत यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी निवेदन स्वीकारत, “येत्या पंधरा दिवसांत सर्व खड्डे बुजवले जातील. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा रस्ता शंभर मीटरचा होणार असून त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येईल,” असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात जिजाई फाऊंडेशनच्या संचालिका मनीषा पालवे, रमेश पिंगळे, बाळासाहेब धात्रक, सुभाष तिडके, संजय पिंगळे, संतोष तिडके, महेश मानकर, प्रल्हाद माळी, अंकुश काकड, कल्पेश पिंगळे, राकेश खैरनार, तानाजी नेमाडे, महेश शेळके, कल्पना पिंगळे, ज्योती कुमावत, प्रकाश खराटे, तेजस भोज यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर फडोळ मळा ते मखमलाबाद गाव हा रस्ता रुंदीकरणासह काँक्रीट केला जाणार आहे. पुढील पंधरा दिवसात मखमलाबाद रस्त्यावरील खड्डे बुजवणार. लवकरच कॉलनी रस्त्यांवरील देखील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार.
नितीन राजपूत (उपअभियंता, पंचवटी बांधकाम विभाग)
मखमलाबाद गावाला जोडणारे मुख्य दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. महापालिकेने ड्रीम कॅस्टल ते मखमलाबाद व सुयोजित गार्डन ते मखमलाबाद हे दोन्ही रस्ते काँक्रीटचे बनवून द्यावे. भविष्यात जर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात घडून नागरिक जखमी झाले तर राजीवगांधी भवन येथे आंदोलन केले जाईल.
प्रमोद पालवे (अध्यक्ष जिजाई फाउंडेशन)
मखमलाबाद गावातून अनेक जेष्ठ नागरिक व महिला कामानिमित्त शहरातील इतर भागात येत असतात. मात्र रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेमुळे जेष्ठ नागरिक व महिलांना प्रवास करताना शारीरिक व्याधी जोडल्याने अंथरून पकडले आहे.
रमेश पिंगळे (संचालक मविप्र)
लाखो रुपये नुसते खड्डे बुजविण्यावर खर्च केले तेवढ्या पैशात रस्ता तयार झाला असता. महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी या भागात राहतात मात्र त्यांना देखील जनतेशी काही देणेघेणे नाही.
ज्योती कुमावत (स्थानिक महिला)





