Wednesday, November 13, 2024
Homeनाशिकनाशिक-मुंबई महामार्गाची दुरावस्था; विविध संघटना रास्ता रोको करण्यावर ठाम

नाशिक-मुंबई महामार्गाची दुरावस्था; विविध संघटना रास्ता रोको करण्यावर ठाम

रास्ता रोको न करण्याची प्रशासनाची विनंती; रास्ता रोकोबाबत उद्या निमात बैठक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दयनीय स्थितीला वैतागून शहरातील सर्वच प्रमुख संघटनांनी सोमवारी (दि. २९) पुकारलेल्या रास्ता रोकोमुळे पोलिसांसह सत्ताधाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. पोलिसांनी शनिवारी (दि. २७) दुपारी ३.३० च्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेखातर रास्ता रोको न करण्याची विनंती केली.

यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यास बोलावून पदाधिकाऱ्यांसमाेर कामांबाबतची सत्यस्थिती मांडण्यास सांगितली. मात्र, अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना न सांगता हतबलता दाखविल्याने, पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या, तर प्राधिकरण अधिकाऱ्याने ३१ जुलैपर्यंत कामे मार्गी लावणार असल्याचा शब्द दिला.

शहरातील उद्योजक, डॉक्टर्स, व्यावसायिकांच्या तब्बल ११ संघटनांनी एकजूट होत सोमवारी (दि. २९) विल्होळी येथील जैन मंदिराजवळ तब्बल दोन हजार वाहनांसह रास्ता रोकोचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलिसचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपप्रकल्प संचालक दिलीप पाटील यांना बैठकीस बोलावून घेतले. त्यांनी महामार्ग दुरुस्तीबाबतच्या कामांची माहिती दिली असता, संघटनांचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. वाहतूक कोंडीमुळे चार ते पाच तास वाहने थांबवून ठेवावी लागत आहेत. केवळ थातूरमातूर कामे केली जात असल्याने, महामार्गाची अवस्था जैसे थे असल्याचा आरोप यावेळी उद्योजकांनी केला.

दरम्यान, महामार्गाचे अधिकारी दिलीप पाटील यांनी ३१ जुलैपर्यंतची मुदत मागत कामे मार्गी लावणार असल्याचा शब्द दिला. त्यावर पोलिसांनी रास्ता रोको न करता मुदत देण्याची विनंती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केली. यावेळी नाशिक सिटिझन फोरमचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष ललित बुब, नरेडकोचे अध्यक्ष सुनील गवादे, शंतनू देशपांडे, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कैलास पाटील, मनीष रावल, रवींद्र झोपे, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष सागर वाघचौरे, अरुण सूर्यवंशी आदी उपस्थित हाेते.

मुदत घ्या, टोल बंद करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ३१ ऑगस्टपर्यंत मुदत मागितली असता, तोपर्यंत टोलवसुली बंद करावी अशी भूमिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच कामे करताना त्या ठिकाणी दोन प्रतिनिधींना नियुक्त करून कामांच्या दर्जाचा आढावा घ्यावा. कामे वेळेत पूर्ण न झाल्यास प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आदी भूमिका उद्योजकांनी मांडली.

महामार्गाची क्षमता संपुष्टात; समृद्धीवर भर
महामार्गावर दररोज ८० हजारांहून अधिक वाहने धावत असून, त्याची क्षमता केव्हाच संपुष्टात आली आहे. त्यामुळे महामार्गाचे सहापदरीकरण तसेच काँक्रिटीकरण, दोन सर्व्हिस रोड उभारणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही दिल्ली मुख्यालय तसेच केंद्रीय मंत्रालयाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, समृद्धीची सुविधा झाल्याने, त्यावर वाहने वळतील व नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कमी होईल, असे उत्तर मुख्यालयाकडून दिले जात असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.

दर तीन दिवसांनी एकाचा मृत्यू
ग्रामीण पोलिसचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी सांगितले की, महामार्गावर दर तीन दिवसांनी एकाचा मृत्यू होत आहे. गेल्या आठवड्यात एकाच स्पॉटवर तीन बळी गेले, तर दुसऱ्या स्पॉटवर दोन बळी गेले. घोटी पोलिसाचादेखील महामार्गावर अपघात झाला असून, अजूनही त्याची स्थिती गंभीर आहे. जसे तुम्हाला सुसज्ज रस्ते हवे आहेत, तसेच पोलिसांनाही रस्त्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

रास्ता रोकोबाबत उद्या बैठक
पोलिसांच्या नोटिसीनंतर रास्ता रोकोची परवानगी मिळावी याबाबतचे पत्र नाशिक सिटिझन फोरमच्या वतीने यावेळी देण्यात आले. रास्ता रोकोबाबतचा निर्णय घेण्यासाठी रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता निमा कार्यालयात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या