Wednesday, June 10, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट, चित्तेंचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश

Shrirampur : श्रीरामपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट, चित्तेंचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश

काहींची सोय तर काहींची गैरसोय होणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अनेक वर्षापासूनचे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच प्रदेश भाजप ओबीसीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आपल्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनुष्यबाण असलेला हिंदुत्वाचा भगवा ध्वज हाती घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर श्री. चित्ते यांनी केलेल्या या राजकीय प्रवेशामुळे श्रीरामपुरातील अनेक राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

ठाणे येथील स्व. गंगुबाई संभाजी शिंदे सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश प्रसंगी माजी नगरसेवक किरण लुणिया, अशोक कारखान्याचे माजी संचालक बबनराव मुठे, संजय पांडे, राजेंद्र कांबळे, शशिकांत कडुसकर, मनोज हिवराळे, संजय यादव, गणेश भिसे, सुरेश आसने, सुरेश सोनवणे, अक्षय नागरे, सोमनाथ कदम, सिद्धार्थ साळवे, सोमनाथ पसंगे, बाळसाहेब गाडेकर, अण्णा थोरात, अनिल बोडखे, नारायण पिंजारी, सुहास बंगाळ, दर्शन चव्हाण, संजय राऊत, बाबुराव सुडके, सतिष शेळके, रमेश शिणगारे, तुषार बोबडे, शेखर आहेर, विशाल जाधव यांच्यासह दोनशे समर्थक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश चित्ते व सौ.दीपाली चित्ते यांच्या हाती शिवसेनेचा भगवा ध्वज देऊन पक्षात प्रवेश दिला. यावेळी त्यांच्या समवेत शेकडो समर्थकांनी प्रवेश घेताना प्रकाश अण्णा आगे बढो च्या… घोषणा दिल्या.

गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपची पक्ष संघटना निष्ठेने वाढविणार्‍या चित्ते यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार नसल्याने तसेच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचे काम केले होते. त्यामुळे कांबळे दुसर्‍या स्थानी राहिले. त्यांच्यावर महायुतीच्या विरोधात काम केल्याच्या ठपका ठेऊन चित्ते यांना भाजप पक्षातून काढण्यात आले होते. वास्तविकपणे काँग्रेस मधुन ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात येऊन महायुतीची उमेदवारी मिळविलेले माजी आ. लहू कानडे हे चौथ्या स्थानी राहिले. हे शल्य मनात ठेऊन चित्ते यांच्यावर व्यक्ती द्वेषातून ही कारवाई झाली, असा मूळ भाजपा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. खरंतर मत विभाजन झाले नसते, आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियोजित सभा ऐनवेळी रद्द केली नसती तर विधानसभेला चित्र वेगळे दिसले असते.

पक्षनिष्ठ चित्ते यांनी भाजपात पुन्हा जाण्यासाठी सर्व मार्गानी केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांनी अखेर हिंदुत्ववादी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा हा अनपेक्षितपणे झालेला सेना प्रवेश तालुक्यातील राजकीय समीकरणाला कलाटणी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चित्ते नव्या जुन्या गटाचा कसा मेळ घालतात यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यांच्या प्रवेशाने काहींची सोय तर काहींची गैरसोय होणार आहे. त्यांच्या या प्रवेशामागे अनेक मोठ्या दिग्गजांचे आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या नव्या राजकीय घडामोडी पुढे कसे वळण घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...