श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील मांडवे-गंगापूर येथील प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यात शेकडो मासे मृत पावल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. वर्षांभरातील ही दुसरी घटना असून नागरिकांसह पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नदीपात्रात मासे नेमके कशामुळे मृत पावले हे समजू शकलेले नाही. या मृत माशांची दुर्गंधी मात्र नदीकाठावरील दोन्ही बाजुच्या गावांत पसरली आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याजवळ पाणी अडवले गेले असल्यामुळे पाठीमागे मांडवे-गंगापूर पुलापर्यंत पाणी साठविण्यात आले आहे.
या बंधार्यातील जलपर्णी तसेच मृत मासे कुजल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपासून नदीपात्रात मृत्युमुखी पडलेल्या माश्यांचा थर साठला असल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेकांना उलट्या व मळमळीचा त्रास होत आहे. कोल्हार परिसरातून ड्रेनेजचे पाणी तसेच केमिकल्स युक्त पाणी दिवसाढवळ्या नदीपात्रात सोडले जाते आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम जलचरांवर होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रदूषण महामंडळाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मृत मासे बाजारात विक्रीला ?
मासेमारी करणार्या लोकांनी काल मिळेल तेवढे लहान मोठे मासे बाजारात विक्रीसाठी नेले असल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रेनेजचे अन् केमिकल्सयुक्त घाण पाणी
नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी अन् केमिकल्स मिश्रित पाणी सोडल्याने पाण्यावर तेलकट तवंग आला असून पाणी काळेभोर झाले आहे.