मुंबई । Mumbai
अक्कलकोट येथे रविवारी (14 जुलै) एक धक्कादायक घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत काळे फासले आणि त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. या घटनेमुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे गेले असताना हा प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना अचानक घेरले, त्यांच्यावर काळे फासले आणि मारहाणीचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सोमवारी (14 जुलै) या प्रकरणाचा विषय विधानसभेत जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत गृहमंत्रालय आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “प्रवीण गायकवाड यांच्यावर केवळ राजकीय मतभेदामुळे हल्ला झाला आहे. त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त का नव्हता? आणि इतकी मोठी घटना घडूनही पोलिसांनी तत्काळ कारवाई का केली नाही?” असा सवाल वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्पष्ट निवेदन द्यावे आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी केली.
या प्रकरणावर विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले, “ही घटना ‘संभाजी’ नावावरून निर्माण झालेल्या वादातून घडली. आरोपींनी विचारले की ‘तुम्ही फक्त संभाजी का म्हणता? छत्रपती संभाजी महाराज असे का नाही म्हणत?’ आणि त्यातूनच शाईफेक झाली.” फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की, “पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. गायकवाड यांनी प्रथम तक्रार नोंदवण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी पुढाकार घेऊन स्वतः तक्रार दाखल केली. आठ आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत. कायद्यानुसार योग्य कलमे लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर विरोधकांनी ताशेरे ओढले आहेत. अशा प्रकारचे हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे विरोधकांचे मत आहे. तसेच, अशा घटनांना प्रोत्साहन मिळाल्यास सामाजिक सलोखा धोक्यात येईल, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली आहे. राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. विविध सामाजिक संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गायकवाड यांच्यावर हल्ला होणे म्हणजे लोकशाही मुल्यांवर आघात असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





