नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मानधन तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर सादर करण्याचे आदेश सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रशासनाला दिले.
मनपात स्थायी समितीची सभा सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी आदेश दिले. यावेळी मनपा आयुक्त मनिषा खत्रींसह इतर अधिकारी उपस्थित होते. मनपातील वाढत्या मनुष्यबळाच्या कमतरतेवर चर्चा झाली. शहराचा वाढता विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी लक्षात घेता सध्याचे उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. महापालिकेच्या मंजूर सुमारे सात हजार पदांपैकी सध्या अवघे तीन ते साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत असल्याने विविध विभागांवरील कामाचा ताण वाढला आहे. परिणामी नागरिकांना सेवा देताना विलंब होत असून अनेक विकासकामांवरही त्याचा परिणाम होत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावर नियमित सरळसेवा भरती पूर्ण होईपर्यंत आवश्यक त्या पदांवर पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याबाबत आवश्यक माहिती, रिक्त पदांची संख्या, आर्थिक परिणाम आणि भरतीची प्रक्रिया याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना सभापती सानप यांनी प्रशासन विभागाला दिल्या.
अनुकंपाधारकांना वेतनश्रेणी लागू व्हावी
नाशिक महानगरपालिकेतील अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिवसापासून शैक्षणिक पात्रतेनुसार नियमित वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी राहुल दिवे यांनी स्थायीच्या बैठकीत केली. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेतील अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी शासन निर्णय आणि नगरविकास विभागाच्या पत्रांचा दाखला देत, अनुकंपाधारकांची गट क व गट ड अशी स्वतंत्र प्रतीक्षा यादी ठेवली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
माझ्याकडे तुमची क्लिप : शहाणे
स्टार रेट विषयावर चर्चा सुरू असतांना मुकेश शहाणे यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांना उद्देशून, माझ्याकडे तुमच्या त्या संभाषणाची क्लिप आहे, असा दावा केला. यावेळी सभागृहात काही काळ खळबळ उडाली. बैठकीत सदस्यांनी स्टार रेटबाबात पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेत सध्या ठेकेदारांना विविध कामांसाठी स्टार रेट देण्याचा विषय चांगलाच गाजत असून, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार होणार असल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीतील हा गौप्यस्फोट महत्वाचा मानला जात आहे.




