
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि पक्षाचे कोषाध्यक्ष जय पवार यांची निवडणूक रणनीतीकार आणि आमदार प्रशांत किशोर यांच्यासोबत मुंबईत काल बैठक झाली. ही बैठक सुमारे पाच ते सहा तास चालल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर पक्षाच्या भविष्यातील रणनीती, संघटनात्मक बदल आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची दुसरी भेट आहे. याआधी प्रशांत किशोर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा बांकीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ही भेट झाली आहे.
संपादकीय : ७ ऑगस्ट २०२६ – जनहिताच्या मुद्यांवर स्पर्धा हवी
बैठकीत नेमकी काय चर्चा?
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी, जिल्हानिहाय पक्ष विस्तार, युवा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन रणनीती, डिजिटल प्रचार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकांची तयारी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक स्थितीचे प्राथमिक सादरीकरण केल्याचेही सांगितले जात आहे. यासोबतच, गेल्या काही महिन्यांत सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील ही दुसरी महत्त्वाची बैठक असल्याचे मानले जाते. त्यामुळे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसला औपचारिकपणे निवडणूक सल्लागार म्हणून जोडले जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यासंदर्भात पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सुनील तटकरेंबाबत नाराजी?
सुत्रांच्या माहितीनुसार, कालच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत जाहीर नाराजी बोलून दाखवली. जोपर्यंत राज्यातील नेतृत्वसोबत काम करणार नाही, तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणे कठीण असल्याचे प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना सांगितले. यापूर्वी सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी तीनवेळा प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. तेव्हा प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटनेत काही बदल सुचवले होते. मात्र, गेल्या तीन बैठकांमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींची अंमलबजावणी होत नसेल तर काम करणे कठीण आहे. भविष्यातील निवडणुकांसाठी मी काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशी ठाम भूमिका प्रशांत किशोर यांनी कालच्या बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




