Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशPrince Philip : प्रिन्स फिलिप यांचं निधन

Prince Philip : प्रिन्स फिलिप यांचं निधन

दिल्ली l Delhi

- Advertisement -

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे निधन झाले आहे. ते ९९ वर्षाचे होते. बकिंगहॅम पॅलेसने याबाबतची घोषणा केली.

राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलीप यांचा १९४७ साली विवाह झाला होता. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ सोबत व्यतीत केलेले पती-पत्नी होते. अवघ्या आठवड्याभरापूर्वीच प्रिन्स फिलीप अर्थात ड्यूक ऑफ एडिनबर्ग रुग्णालयातून उपचारांनंतर पॅलेसमध्ये परतले होते. त्यांच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, प्रिन्स फिलीप यांच्या निधनाबाबत बकिंगहम पॅलेसने याबाबत पत्रक जारी केलं आहे. ‘राणी एलिझाबेथ यांनी अत्यंत दुख:द घोषणा केली आहे. प्रिय पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’

प्रिन्स फिलीप यांच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटनवर दुखवटा आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींमधील ब्रिटीश ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

प्रिंस फिलीप यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक संदेश येण्यास सुरूवात झाली आहे. गेले काही दिवस ते आणि महाराणी एलिझाबेथ यांना कोविड संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पश्‍चिम लंडन मधील विंडसर कॅस्टल या राजविलासात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले होते. तेथे ते क्वचित सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असत. गेल्या जुलै महिन्यात विंडसर कॅस्टल मध्ये झालेल्या लष्करी कार्यक्रमावेळी ते उपस्थित होते. तोच त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला आहे. या दाम्पत्याला चार मुले,आठ नातू आणि नऊ पणतू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या