सिन्नर | वार्ताहर Sinnar
नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटातील वळणावरील गतिरोधकाजवळ मंगळवारी (दि.२३) सकाळी ९.३० च्या सुमारास भरधाव खासगी बसने पुढे चाललेल्या दुचाकीला धोरदार धडक देत दुचाकीसह दोघांना बरेच अंतर फरफटत नेले. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
महेश भोरीक सिंह (३१, रा. वैदुवाडी, सिन्नर) हे आपले नातेवाईक सरोजसिंह सूरजसिंह यांच्यासह आपल्या दुचाकी (क्र. एम. एच. १५/ जे. के.२९७३) ने सिन्नरहून नाशिककडे जात होते. मोहदरी घाटातील वळणावर असलेल्या गतिरोधकाजवळ महेश यांनी दुचाकीचा वेग कमी केला. मात्र, याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणार्या खासगी बस (क्र. एम. एच. ०७/ एक्स. २७९९) ने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी थेट बसखाली अडकली. त्यानंतरही बसचालकाने बस सुरूच ठेवली. त्यामुळे दुचाकी थेट बसच्या खाली मध्यभागापर्यंत जाऊन अडकली. धडकेनंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेले सूरजसिंह व महेश हे रस्त्यावर फेकले गेले. अपघातात महेश जखमी झाले तर सूरजसिंह यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना जबर मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सूरजसिंह यांची प्राणज्योत मालवली होती. अपघातानंतर काहीकाळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला व त्यानंतर वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा बसचालक बस रस्त्यातच सोडून फरार झाला. याप्रकरणी महेश सिंह यांच्या फिर्यादीवरून बसचालक नामदेव (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) याच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास हवालदार टेमगर करत आहेत.
घाटातील गतिरोधक धोकादायक
मोहदरी घाट परिसरात वारंवार होणार्या अपघातांमुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. घाटातील वळणा-वळणाचा रस्ता, वेगमर्यादेचे उल्लंघन, जड व प्रवासी वाहनांचा बेदरकार वेग यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. घाटाच्या वळणावर काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले असून हे गतिरोधक वाहनधारकांच्या लक्षात येत नाहीत. ज्या वाहनधारकांचा नेहमीचा रस्ता आहे ते या गतिरोधकावर वाहनांचा वेग कमी करतात. मात्र, इतर वाहनांना याचा अंदाज येत नसल्याने असे अपघात घडतात. घाटातील गतिरोधकावर आजवर अनेक अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतीमर्यादा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे व नियमित पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.





