मुंबई । Mumbai
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले आणि सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मात्र, या तणावपूर्ण परिस्थितीतही आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांमध्ये सामना होणार आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) जोरदार टीका केली आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधताना म्हटलं की, भारतीय जवान आणि नागरिकांचे रक्त यापेक्षा आर्थिक हितांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांनी या सामन्याला परवानगी देण्याच्या निर्णयाला ‘ब्लड मनी’ आणि ‘शापित पैसे’ असा उल्लेख केला. “पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा ढोंगीपणा लज्जास्पद आहे. बीसीसीआयनेही आर्थिक लाभासाठी जवानांच्या बलिदानाचा अपमान केला आहे,” असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आशियाई क्रिकेट काऊंसिलने (एसीसी) दुबई आणि अबुधाबी येथे होणाऱ्या आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर चतुर्वेदी यांनी ही प्रतिक्रिया दिली. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. एसीसीने या सामन्याला ‘ब्लॉकबस्टर सामना’ असे संबोधले आहे. सुपर फोर आणि फायनल टप्प्यातही दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने येऊ शकतात, असे एसीसीने स्पष्ट केले आहे.
चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्या देशाने दहशतवादाला खतपाणी घातले, त्या देशाशी क्रिकेट खेळणे म्हणजे जवानांच्या बलिदानाचा अवमान आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.या प्रकरणी बीसीसीआय आणि केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या टीकेमुळे राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्या विधानानंतर आशिया कप सामन्याबाबत जनतेच्या प्रतिक्रिया काय असतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





