दिल्ली । Delhi
सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर सभागृहात तीव्र चर्चा झाली. गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेत सहभाग घेतला. मात्र, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली.
प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केल्याचा दाखला देत सांगितले की, त्या हल्ल्यावेळी गृहमंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. तसेच, जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. पण, पुलवामा, मणिपूर आणि पहलगामच्या घटनांनंतर कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही, असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. “पहलगाममध्ये हल्ला कसा आणि का झाला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या प्रश्नानंतर सभागृहात शांतता पसरली.
प्रियंका गांधी यांनी पहलगाम हल्ल्यातील बळींपैकी एक शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. “लोकांनी सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला भेट दिली, पण सरकारने त्यांना असुरक्षित सोडले. या हल्ल्याला जबाबदार कोण? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांची नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, “सरकारकडे अशा हल्ल्यांची पूर्वसूचना देणारी कोणतीही यंत्रणा नाही का? हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे का?”
प्रियंका गांधी यांनी सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले आणि त्याची घोषणा भारताच्या सरकारने किंवा सैन्याने नव्हे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. हे पंतप्रधानांच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे,” अशी टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या, “लोकांना आता पोकळ भाषणे नकोत, त्यांना 22 एप्रिल रोजी नेमके काय घडले हे जाणून घ्यायचे आहे. पण सरकार स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहे.”




