नाशिक | प्रतिनिधी
पोलीस आयुक्तांनी परिपत्रक जारी करत शहरात ११ नोव्हेंबर रात्री १२ ते २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत १५ दिवसांकरिता जमावबंदी आदेश लागू केला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी परिपत्रक जारी करून मनाई आदेश लागू केला आहे.
नाशिक शहरात जनतेच्या विविध मागण्यासाठी, राजकिय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी, कामगार व व्यापारी संघटना हया मोर्चे, धरणे, निदर्शन, बंद पुकारणे, उपोषणे यांसारखे आंदोलने तसेच धार्मिक संणांचे आयोजन करतात. राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषयक घडामोडींच्या तसेच देशात इतरत्र घडलेल्या घटनांचे पार्श्वभूमीवर त्याच्या प्रतिकिया नाशिक शहरात लवकर उमटत असतात.
महाराष्ट्र राज्यात विविध पक्षामध्ये फुट पडुन विरोधक व सत्ताधारी नेत्यांमध्ये फुट पडल्याने विविध पक्षाचे कार्यकर्ते निषेध व समर्थन करीत आहेत. विविध व वेगवेगळ्या प्रकरणावरून जनमानसात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच मराठा, धनगर व ओबीसी आरक्षणाचे अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी आंदोलने चालु आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता ११ नोव्हेंबर रात्री १२ ते २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत १५ दिवसांकरिता पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश जारी करत जमावबंदी देखील लागू केली आहे.
मनाई आदेश कोणाला लागु
१५ दिवसांच्या कार्यकाळात जारी केलेला मनाई आदेश, स्फोटक पदार्थ जवळ बाळगू नये, दगड,शस्त्र व हत्यारे न बाळगणे व जमा न करणे. कुठल्याही व्यक्तीचे चित्र प्रतीकात्मक प्रेताचे किंवा पुढार्याचे चित्रांचे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन किंवा दहन करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे,वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे,पेढे वाटणे,फटाके वाजविणे,धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे, पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र जमणे याकरिता मनाई आदेश लागू आहे.
मनाई आदेश कुणाला लागू नाही
लग्नकार्य,धार्मिक विधी,प्रेत यात्रा,सिनेमागृह,यांना लागू नाही .