Saturday, May 30, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : कारवरील नियंत्रण सुटलं अन्….; भीषण अपघातात दोघा भावांचा भयानक...

Pune Accident : कारवरील नियंत्रण सुटलं अन्….; भीषण अपघातात दोघा भावांचा भयानक अंत

पुणे । प्रतिनिधी

- Advertisement -

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे हादरला आहे. रविवारी (ता. २) पहाटे बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृतांमध्ये ऋतिक भंडारी आणि यश भंडारी या सख्ख्या चुलत भावांचा समावेश आहे. तर, कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, काळ्या रंगाची एम एच २४ डी टी ८२९२ ही भाड्याने घेतलेली कार अतिवेगात होती. कारमध्ये बसलेल्या तिघांपैकी एकाने हँड ब्रेक खेचल्याने वाहनाचा ताबा सुटल्याचा संशय आहे. नियंत्रण सुटल्यावर कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली आणि थेट मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिलरवर जाऊन आदळली. धडक एवढी भीषण होती की कारचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडी नेमकी कुठून आली आणि ती कोणी भाड्याने घेतली याचा तपास सुरू आहे. त्यासाठी परिसरातील तसेच रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्या दृश्यांमधून वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे स्पष्ट दिसते. अतिवेग आणि नियंत्रण सुटणे ही या अपघाताची मुख्य कारणे असावीत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. कारमध्ये अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला होता का, याची तपासणी करण्यात येणार आहे. अपघाताच्या वेळी वाहनातील परिस्थिती, ब्रेक सिस्टम, टायरची स्थिती याचा देखील तपास केला जाण्याची शक्यता आहे. दोन तरुणांचा जीव जाण्याने परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेली वेगाची आवड, तसेच रात्रौ उशिरा वाहन चालवताना घेतली जाणारी बेपर्वाई यावर आता पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ताज्या बातम्या

default-featured-image

जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा खून

0
दिंडोरी | प्रतिनिधी तालुक्यातील जांबुटके येथे जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा खून करून मृतदेह गोणीत लपवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जांबुटके गावात...