Sunday, September 6, 2026
HomeराजकीयManoj Jarange : मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु; सरकारला दिला...

Manoj Jarange : मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु; सरकारला दिला ‘हा’ इशारा, नेमकं काय म्हणाले?

जालना | Jalna

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले असून, आजपासून (शनिवार) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही आणि मागण्यांच्या अंमलबजावणीचा ठोस कालावधी स्पष्ट होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या उपोषणापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की “माझा संघर्ष प्रामाणिक आहे. सरकारे येत राहतील आणि जात राहतील; पण मी माझ्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांचे शिष्टमंडळ अपयशी, जरांगे पाटील भूमिकेवर ठाम

उपोषण सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. सरकार सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ठोस लेखी आश्वासनाशिवाय मागे हटणार नसल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी उपोषणावर बसण्याचा निर्णय कायम ठेवला. “शासनाच्या शिष्टमंडळावर माझा अविश्वास नाही, ते येतील आणि चर्चाही करतील; पण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

समाजासाठी मरायला तयार म्हणत जरांगे पाटील भावूक

उपोषणाला सुरुवात होण्यापूर्वी अंतरवाली सराटीत महाराष्ट्रभरातून हजारो मराठा बांधव जमा झाले होते. हा जनसागर पाहून मनोज जरांगे पाटील अत्यंत भावूक झाले. यावेळी ते म्हणले की, “लोकांचा माझ्यावर किती जीव आहे, हे पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. समाजाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. सरकार वारंवार मराठा समाजावर अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी आणि माझ्या लेकरांसाठी मरायला तयार आहे, पण आता मागे हटणार नाही. मला इथे गोळ्या घालून मारले किंवा या तळपत्या उन्हात तडफडून मरू दिले, तरीही मी समाजासाठी लढत राहीन,” अशा अत्यंत भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सरकारच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या एल्गारामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रणरणत्या उन्हात सुरू झालेल्या या उपोषणाचा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो आणि वाढता असंतोष पाहता राज्य सरकार आता कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या काय?

  • कुणबी प्रमाणपत्र: ५८ लाख नोंदीधारकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश शासनाने काढावा.
  • जीआर व गॅझेटर अंमलबजावणी: सातारा संस्थानचा जीआर लागू करावा. तसेच गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्यांना प्रमाणपत्र व वैधता देण्यात यावी; यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा आदेश द्यावा.
  • गुन्हे मागे घेणे: आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
  • आर्थिक मदत व नोकरी: आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी देण्यात यावी.
  • स्वतंत्र मंत्रालय: मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.

ताज्या बातम्या

Kopargaon : शेतकर्‍यांचा बळी देऊन विकास नको – आ. आशुतोष काळे

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon विकास कामांच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही. शिर्डी-पोहेगाव-नाशिक रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात येणार्‍या जमिनीचा शेतकर्‍यांना जास्तीत जास्त...