Wednesday, February 18, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : धक्कादायक! लग्नाला चार दिवस उरले असताना तरुणीचं अपहरण; आई...

Pune Crime : धक्कादायक! लग्नाला चार दिवस उरले असताना तरुणीचं अपहरण; आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकून पळवून नेलं

पुणे । Pune

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना एका तरुणीचे तिच्या घरासमोरून अपहरण करण्यात आले आहे. आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून हे कृत्य केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला होता. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. घटनेच्या वेळी तरुणी घराबाहेर असताना दोन आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी नियोजित कटानुसार तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकली. यामुळे कुटुंबाला काही समजण्याच्या आतच आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने एका वाहनात बसवले आणि तिथून वेगाने पळ काढला. या घटनेतील संशयित आरोपी हा तरुणीच्या शेजारीच राहणारा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून त्या दोघांमध्ये फोनवरून संवाद सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, भरदिवसा कुटुंबावर हल्ला करून मुलीला पळवून नेल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

YouTube video player

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच भिगवणमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आपल्या भागातील मुलीचे अशा प्रकारे अपहरण झाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी संतप्त जमावाने पुणे-सोलापूर महामार्ग काही काळासाठी रोखून धरला, ज्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. आरोपींना तातडीने अटक करून मुलीची सुखरूप सुटका करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच ते सहा विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांना वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ आज स्थानिक नागरिकांनी ‘भिगवण बंद’ची हाक दिली आहे. लग्नघरातील मुलीचे अपहरण झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांनी या कुटुंबाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला व्यापारी आणि स्थानिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून, लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकल्या जातील आणि तरुणीची सुरक्षित सुटका केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणीचे असे अपहरण झाल्याने सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, असा आहे संपूर्ण...

0
मुंबई । Mumbai भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिल २०२६ मध्ये १० राज्यांतील ३७ सदस्यांचा कार्यकाळ...