Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात विंचूर!

पडसाद : गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात विंचूर!

कांद्याची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले लासलगाव आणि पैठणीचे देशभरातील खात्रीशीर ठिकाण येवला. या दोन व्यावसायिक गावांचा केंद्रबिंदू म्हणून अलिकडे विंचूरचे नाव सर्वतोमुखी झाले. याचजोडीने कांदा व धान्याची बाजारपेठ तसेच वाईन पार्क यामुळेही विंचूरचा दबदबा वाढला. औद्योगिक वसाहतीचाही प्रसिद्धीत खारीचा वाटा नक्कीच आहे, पण ही वसाहत भलत्याच उद्योगांमुळे चर्चेत येत असते, अन्यथा विंचूरचे सुदृढपण आणखी पुढे आले असते. तरीदेखील हे गाव सध्या गाजते आहेच, पण ते वेगळ्याच कारणाने.

- Advertisement -

गावाचे महात्म्य वेगळे आणि सध्या ज्या काही उद्योगांनी विंचूरचे नाव कर्णोपकर्णी होत आहे ते वेगळे. गेल्या महिनाभरातील काही दाखलेच देऊयात, म्हणजे वाचकांना नेमकेपणाने कळू शकेल. १) विंचूरला बनावट दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त २) तीन किलो एमडी जप्त ३) मुखत्यारपत्राच्या आधारे जमीन विक्री ४) शासकीय दवाखान्यात कालबाह्य औषधे या प्रसिद्ध झालेल्या किंवा बाहेर आलेल्या मोजक्या बातम्या. बनावट दारु निर्मितीचा कारखाना नाशिकच्या भरारी पथकाने उद्ध्वस्त केला तर एमडी या बंदी घातलेल्या अंमली पदार्थाचा साठा व विक्री करणार्‍यांवर कारवाई केली ती देखील नाशिकच्या पोलिसांनी. स्थानिक पोलिसांना सुगावाही लागू न देता या कारवाया झाल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेविषयीचा प्रश्न पुढे आलाच.

परंतु, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात सुरु असलेल्या इतरही अवैध व्यवसायांकडे लक्ष द्यायला हवे, एवढी स्थिती भयंकर आहे. अर्थात, केवळ पोलिसांनाही दोष देऊन चालणार नाही. कारण या व्यवसायांना कोणाचा आशीर्वाद हे देखील बाहेर यायला हवे. हल्ली जेथे राजाश्रय असतो तेथे पोलिसांना वक्री नजर करता येत नाही, हे उघड सत्य आहे. गेल्या चार पाच वर्षात कांदा तसेच धान्य मार्केट चांगलेच नावारुपाला आले. परिणामी रोजगाराची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता झाली. अशा कष्टाच्या व वेळकाळाचे बंधन नसलेल्या परप्रांतीय मजुरांनी ही बाजारपेठ काबीज केली. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आदी राज्यातील मजुरांचा वावर वाढला.लहानमोठ्या चोर्‍याही नेमक्या याच काळात वाढू लागल्याने रोजगारवाढीत गुन्हेगारी प्रवृत्तींचा कधी शिरकाव झाला हे कळायच्या आतच विंचूर वेगवेगळ्या बेकायदा व्यवसायांसाठी जणू आगर बनत गेले. अगदी लहान खेड्यांमध्येही एमडी हा अंमली पदार्थ सहजी मिळू लागला. बनावट दारु बनविण्याचे कारखाने सुरु झाले. हे सारे बिनदिक्कत सुरु होते, याचाच अर्थ कोणीतरी बडी व्यक्ती त्यांच्या पाठीशी आहे. कारण अशा धंद्यासाठी सर्वार्थाने अत्यंत पोषक वातावरण तेथे तयार झाले.

मजुरांचा वाढता वावर, स्थानिक बेरोजगारांच्या फौजा आणि सोबतच धनदांडग्यांचा चवचालपणा यामुळे विंचूरची ही पवित्र भूमी अल्पावधीतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची नगरी बनत गेली. मध्यंतरी तर स्वस्त धान्य दुकानातील तांदळासह इतर धान्याचा काळाबाजार करतांना एकाला पकडले. हे प्रकरणही रफादफा केले गेले. येथून गुजरातसह इतर राज्यात असे धान्य पाठविण्याचा गोरखधंदा केला जात असल्याचा आरोप आहे. मटक्याचे अड्डे, पत्त्यांचे क्लब यांनी तर उच्छाद मांडला आहेच. रिकामपणाचे हे धंदे हळूहळू गुन्हेगारीपर्यंत कसे पोहोचले हे संबंधितांनाही कळले नाही.

शासकीय जमिनीवरील मुरुम उत्खनन करण्याचा आणखी एक बेकायदा धंदा येथे जोरात आहे. विठ्ठलवाडी, सुभाषनगर येथे जाऊन महसूल अधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे पाहणी केली तर शासनाचा कोट्यवधींचा महसूल कसा कोणाकोणाच्या खिशात चाललाय, याची माहिती मिळू शकेल. अजस्त्र यंत्रसामग्रीद्वारे हे बेकायदा उत्खनन चालू असतांनाही शासकीय यंत्रणा मात्र डोळेझाक करते, याचा अर्थ ही मोठी साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विंचूरच्या या बदलत्या परिस्थितीमुळे जुनेजाणते लोक काळजी तर करीत आहेतच, पण हे थांबवावे असे वाटत असूनही त्यांना यातून मार्ग सापडत नाही. पुढारी आणि लोकप्रतिनिधींना अशा व्यवहारांवर नियंत्रण आणता येत नाही. कारण उघड आहे. लोकांना ते कळते देखील. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची एवढाच काय तो प्रश्न. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हे महत्त्वाचे शहरवजा गाव, खरे तर अलिकडेच प्रसिद्ध होऊ लागले होते.

गावाची भरभराट होत असतांनाच म्हणजेच लक्ष्मीचा प्रवेश होत असतांनाच पाठोपाठ गुन्हेगारीची अवदसाही चोरपावलांनी शिरली. या अवदसेला स्थानिक काही मंडळींचीच साथ आहे. त्यामुळेच भरभराट होत असली तरी गावातील तरुणाई अंमली पदार्थाचे सेवन, जुगार, दारु अशा दुष्टचक्रात सापडल्याने येत असलेल्या समृध्दीचेही आताशा कोणाला फारसे कौतुक राहिलेले नाही. हे पाप नक्की कोणाचे ते शोधून काढायला हवे. पण, ते धाडस कोणी दाखवायचे हाच लाखमोलाचा प्रश्न आहे. पोलिस, प्रशासन, अन्न-औषधे खाते, महसूल आदी खात्यातील मंडळी नेमके काय करतात असा जाब विचारायला हवा. लोकांचे प्रतिनिधी म्हणून मिरविणार्‍या काही मंडळींनी जर डोळ्यावर पट्टी अन् कानात कापसाचे बोळे कोंबले असतील तर आम जनता तरी काय करणार? अशा परिस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावणार हे ओघानेच आले.

( उद्याच्या अंकात – भुजबळ साहेब, आहात कुठे?)

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...