मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला होता.यात अजितदादांसह सुरक्षारक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांच्या विमानाचा अपघात नसून, घातपात असू शकतो अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले होते. त्यानंतर आज (बुधवारी) रोहित पवारांनी (Rohit Pawar) पत्रकार परिषद घेत पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घातपात झाला असावा, असा आरोप केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, “एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो. मात्र, आपण जर अपघातस्थळी पाहिलं तर अजितदादाचे जे विमान होते, कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं. तर एका साईडला पडलं होते. त्यामुळे ते जोरात आदळले. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका घेतली जात, त्याचं मुख्य कारण, याबद्दल काही शंका व्यक्त करण्यात येत आहे. ती खरी ठरताना दिसत आहेत. अजितदादांच्या त्या विमानात जे फ्यूल टँक होते, ते अधिकचे होते. खरंतर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतात. त्याच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो आणि हे विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते,असे रोहित पवारांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “फ्यूल टँक पूर्ण भरायची गरज नव्हती. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंधन भरता आलं असतं. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर मग इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होतं असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? मुद्दाम पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा”, मोठा दावा रोहित पवार यांनी केली.
विमान कंपनीबाबत खळबळजनक दावा
सीव्हीआरचा सरकारी नियम आहे की दोन तास संभाषण रेकॉर्ड झालं पाहिजे या विमानातील केवळ ३० मिनिटं होतं. हे विमान आधी खरेदी करण्यात आलं आणि त्यानंतर रजिस्टर करण्यात आलं. किती प्रकारे गैरप्रकार सुरू आहेत हे आपल्याला दिसत असेल. या विमानाचे पाच हजार तास उड्डाण करण्याचे तास होते. अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान आठ हजार तासांपेक्षा जास्त फ्लाय झाल्याची शक्यता आहे. पायलट कपूर आणि रोहित सिंग हे अनधिकृत दोन प्रकारचे विमान चालवत होते. याचे पुरावे देखील आहेत. जितका तपास पुढे जाईल तितकी आणखी सत्यता समोर येईल. रोहित सिंग नावाच्या पायलटचे दोन वेळा दारू पिलेला असल्यामुळे लायसन्स रद्द झाले होते. कॅप्टन कार्लोस हा व्हेंझुयलाचा रहिवासी आहे. भारतात प्रवासी म्हणून प्रवेश करतो आणि इकडे विमान चालवतो. मुळात अशी परवानगी नाही, असा खळबळजनक दावाही रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला.
खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम विमान कंपनीकडून करण्यात येत असल्याचा दावा केला. तसेच आमच्यासारखा बिना बॅकग्राउंडचा, बिना सरकारमधील व्यक्ती एवढी माहिती गोळा करू शकतो मग सत्तेतील लोकांना हे का शक्य नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.
विमानातील ब्लॅकबॉक्स कसा जळाला?
रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की,”विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला, असं सांगण्यात येत आहे. खरं सांगायचं झालं तर ११०० डिग्री सेल्सिअस असताना, तिथे एक तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. जर सहा हजार मीटर खोली पर्यंत पाण्याचे प्रेशर असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा विमानातला ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. विमान पडलं तिथे बरेच कागद होते, पण ते कमी जळले. स्फोटाचा धक्का काही सेकंदाचा असतो. त्यामुळे कागद जळत नाही आणि विमानाची बॉडी पाहिली तर त्याच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स जळण्याची शक्यता कमी आहे”, असंही त्यांनी म्हटले.




