पुणे । Pune
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पिंपरी-चिंचवडपाठोपाठ आता पुणे महानगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (अजित पवार गट आणि शरद पवार गट) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी बारामतीत गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले, ज्याचे पडसाद आता स्थानिक राजकारणात उमटत आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप यांनी विचारसरणीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, रविवारी तळवडे येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याची घोषणा केली. पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आता पुणे महापालिकेतही दोन्ही गट एकत्रित ताकदीनिशी उतरणार आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी अजित पवार गट सुमारे १२५ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर शरद पवार गट उर्वरित ४० जागांवर निवडणूक लढवणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या जागावाटपावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. या निर्णयामुळे पुण्यातील स्थानिक प्रश्न, प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दोन्ही गट संयुक्तपणे काम करतील, असे सांगण्यात येत आहे.
मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एका विशेष प्रकारच्या ‘अंडरस्टँडिंग’सह पुढे जाण्याचे संकेत दिले आहेत. पुण्यात दोन्ही गट एकत्र आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या पारंपारिक समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजप आणि इतर विरोधी पक्षांसमोर या युतीमुळे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. या युतीची अधिकृत घोषणा आज दुपारी पुण्यात होणाऱ्या एका विशेष पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा अंतिम आराखडा, प्रचाराची रणनीती आणि दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची भूमिका स्पष्ट केली जाईल. या युतीमुळे पुण्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




