पुणे | Pune
महानगर पालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार राडे झाले. काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांचं तिकीट नाकारलं, कुठे एबी फॉर्म दिला नाही, कुठे दुसऱ्यानेच एबी फॉर्म पळवला, अशा अनेक घटना शेवटच्या दिवशी घडल्या. या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ मधील शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कृतीने लक्ष वेधलं. शिंदे गटाचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर एबी फॉर्म फाडून गिळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने अवघ्या राज्याचे लक्ष वेधले आहे.
एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेला एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा पुण्यातील उमेदवार उद्धव कांबळेने आपल्या हातून अनावधानाने हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा त्यांनी केला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी उद्धव कांबळेंना नोटीस बजावली आहे.
यानंतर स्वत: उद्धव कांबळे पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी एबी फॉर्म फाडण्यामागची बिहाईंड द स्टोरी सांगितली आहे. त्यांनी अर्ज फाडल्याचे कबुल केले आहे. मात्र आपण फॉर्म खाल्ला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा त्यांनी केला आहे. मच्छिंद्र ढवळे यांनी एबी फॉर्म भरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्यापासून लपवल्याने आपल्याला राग आल्याने आपण एबी फॉर्म फाडल्याचे उद्धव कांबळेंनी म्हटले आहे.
मी फॉर्म गिळला नाही तर…
घडलेल्या घटनेबद्दल विचारले असता, उद्धव कांबळे म्हणाले की, माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत की, मी फॉर्म गिळला… खाल्ला… वगैरे. पण तसे काही झालेले नाहीये. मी फॉर्म खाल्ला नाहीये. मी जेव्हा फॉर्म भरला. त्यानंतर मला समजले की तिथे अर्जाची छाननी सुरू आहे. आणि तिथे मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्याचे समजले. त्यांना मी व्यक्तीश: ढवळेंना ओळखत नाही. त्यांचा पक्षाशी काही संबंधही नाही, तरी त्यांनी कुठून तरी एबी फॉर्म मिळवला आणि तिकडे सबमीट केला आहे. परंतु मी वरिष्ठांना विचारले, तेव्हा त्यांनी मीच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. तसे पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले.
जेव्हा मला प्रकार समजला तेव्हा मी कार्यालयात पोहोचलो. भावनेच्या भरात तो माझ्याकडून फाटला गेला आहे. मी ते १०० टक्के कबुल करतो आहे, माझी चुकी झाली आहे. पण प्रभाग क्रमांक ३६ मध्ये मी अनेक वर्षांपासून काम करतोय. मी एकनिष्ठ आहे. ढवळे यांना मी किंवा शिवसेनेचे कोणतेच पदाधिकारी ओळखत नाहीत. त्यांनी तो फॉर्म कुठून मिळवला, हेही आम्हाला माहीत नाही, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.




