Saturday, May 23, 2026
HomeराजकीयVikas Lawande : विकास लवांडे अटक प्रकरणी पोलीस तोंडघशी; नेमकं काय घडलं?

Vikas Lawande : विकास लवांडे अटक प्रकरणी पोलीस तोंडघशी; नेमकं काय घडलं?

पुणे (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा ज्या गुन्ह्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता, तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध करणाऱ्या पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. शुक्रवारी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये ही सर्व प्रक्रिया केवळ नजरचुकीने घडल्याचे पोलिसांनी मान्य केले. दरम्यान, पोलिसांची ही नजरचूक होती की एका राजकीय प्रवक्त्याला चुकीच्या माहितीच्या आधारे अडकवण्याचा हा प्रयत्न होता?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

विकास लवांडे यांच्यावर ८ मे रोजी वाघोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी लवांडे यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी सुरू असताना, पोलिसांनी लवांडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगत २०१७ साली बिबवेवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचा दावा केला होता. मात्र, तपासात असे समोर आले की, २०१७ मध्ये लवांडे यांच्यावर नथुराम गोडसेच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक ३२/१७ दाखल झाला होता, जो शासनाने २०२२ मध्येच मागे घेतला आहे. पोलिसांनी लवांडे यांच्या नावावर चक्क ३३/१७ हा गुन्हा दाखवला, जो गौतम कांबळे नावाच्या दुसऱ्याच आरोपीचा होता आणि तो दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी दाखल झाला होता. धक्कादायक म्हणजे, त्या गुन्ह्यातून संबंधित आरोपीची निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे.

विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या एका विधानामुळे आणि त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीमुळे चर्चेत होते. या शाईफेकीनंतर शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांचा दुग्धाभिषेकही केला होता. लवांडे यांनी अटकेपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी सुरू आहे, माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड मोकाट असून पोलीस खोट्या फिर्यादीवरून मला अडकवत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी असेही नमूद केले की, ते कायद्याचा मान राखणारे नागरिक असून फरार झालेले नाहीत, तरीही पोलिसांनी त्यांना फोन न करता रात्री घरी जाऊन कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या अजब कारभारामुळे आता त्यांच्या भूमिकेवर आणि तपासाच्या पद्धतीवर सर्वस्तरातून टीका होत असून, एका राजकीय प्रवक्त्याला चुकीच्या माहितीच्या आधारे अडकवण्याचा हा प्रयत्न होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत, पोलिसांनी आपली चूक मान्य केली असली तरी, या नजरचुकीमुळे लवांडे यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

विकास लवांडे यांना पोलिसांनी केलेली अटक ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका सुळे यांनी केली. वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे लवांडे यांच्यावर शाहीफेक करण्यात आली, मात्र, खऱ्या आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी लवांडे यांनाच चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी न्यायालयात ही अटक नजरचुकीने झाल्याचे कबूल केले, यावरून

पोलीस यंत्रणेवर कोणातरी अदृश्य शक्तीचा दबाव असल्याचा संशय सुळे यांनी व्यक्त केला. ज्याच्यावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि हल्ला करणारे मोकाट फिरत आहेत, असा अन्याय आपण कधीही पाहिला नसल्याचे सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले. या दडपशाहीच्या विरोधात आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगी जखमी

0
पेठ | प्रतिनिधी Peth तालुक्यातील मोहाचापाडा येथे शेतातील जनावरांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केले व घराच्या ओट्यावर झोपलेल्या व पाहुणी म्हणून मामाकडे आलेल्या...