Saturday, May 30, 2026
Homeमहाराष्ट्रVishal Aggarwal : पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट! बिल्डर विशाल अग्रवाल...

Vishal Aggarwal : पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट! बिल्डर विशाल अग्रवाल यांना जामीन मंजूर

पुणे । Pune

- Advertisement -

पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या बहुचर्चित ‘पोर्शे कार’ अपघात प्रकरणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केला आहे. गेल्या २२ महिन्यांपासून येरवडा केंद्रीय कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अग्रवाल यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

१९ मे २०२४ रोजी रात्री कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारने एका दुचाकीला भीषण धडक दिली होती. या अपघातात दोन तरुण आयटी इंजिनिअर्सचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. अपघातावेळी कार चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर, त्याला मद्यप्राशनासाठी प्रोत्साहन देणे आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या कटात विशाल अग्रवाल यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी २१ मे रोजी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. यापूर्वी, याच प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप असलेले ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांनाही सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

विशाल अग्रवाल हे पुण्यातील अग्रगण्य बांधकाम उद्योग समूह ‘ब्रम्हा कॉर्प’चे प्रमुख आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून या समूहाचा पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा दबदबा आहे. वडगाव शेरी, खराडी आणि विमान नगर यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी या कंपनीचे अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. याशिवाय, पुण्यातील प्रसिद्ध ली मेरिडियन हॉटेल आणि रेसिडेन्सी क्लब यांसारख्या मोठ्या वास्तूंचे बांधकामही याच समूहाने केले आहे. सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा असलेल्या विशाल अग्रवाल यांच्याकडे या समूहाच्या महत्त्वाच्या कंपन्यांची जबाबदारी आहे.

विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांची प्रचंड आवड असून, त्यांच्या अल्पवयीन मुलाने चालवलेल्या महागड्या पोर्शे कारने दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला होता. या प्रकरणात विशाल अग्रवाल यांनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले होते, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन त्यांना जामीन देण्यात आला आहे.

या अपघातामुळे आणि त्यानंतर झालेल्या पुराव्यांच्या छेडछाडीमुळे संपूर्ण पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अग्रवाल यांना जामीन मिळाला असला तरी, या प्रकरणातील मूळ आरोपी आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्धची कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. या निकालामुळे पोर्शे अपघात प्रकरण पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...