अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा लाभ मिळू शकतो अशा जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 282 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विकास सेवा सोसायटी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या नोटीस फलकावर लावण्यात येणार आहेत. त्याबरोबर शासनाच्या अधिकृत कर्जमुक्ती पोर्टलवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात आधार क्रमांकाच्या साहाय्याने यादीतील नाव आणि संबंधित युनिक क्रमांक तपासता येईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026चा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्यांनी बायोमेट्रिक (अंगठा) आधार प्रमाणीकरण करणे तसेच अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य असल्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आदी कारणांमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या थकबाकीदार शेतकर्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने 2 जून रोजी झालेल्या बैठकीत या योजनेस मान्यता दिली. योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांपैकी 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्ज विचारात घेतली जाणार आहेत. पात्र शेतकर्यांनी प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
आधार प्रमाणीकरणावेळी आधार क्रमांक चुकीचा असल्याचे अथवा त्याबाबत असहमती असल्यास संबंधित आपले सरकार सेवा केंद्र, बँक शाखा किंवा नागरी सुविधा केंद्रातील चालक मूळ आधार कार्डाची पडताळणी करून सहमतीची नोंद करतील व संबंधित तक्रार तालुकास्तरीय समितीकडे पाठवून त्याची पावती देतील. कर्ज खात्याच्या तपशीलाबाबत असहमती असल्यास संबंधित तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल. तसेच बँकेने अपलोड न केलेल्या कर्ज खात्याबाबत शेतकर्यांनी तहसीलदार किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी अर्ज सादर करावा. संबंधित अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येऊन तपासणीनंतर आवश्यक दुरुस्ती करून बँकेच्या माध्यमातून पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्यात येईल. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकर्यांनी बायोमेट्रिक (अंगठा) आधार प्रमाणीकरण करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणीद्वारे फार्मर आयडी तयार करावा, असे आवाहनही सुरवसे यांनी केले आहे.




