अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील बँकेच्या 77 शांखा मार्फत 1 हजार 366 प्राथमिक सेवा सहकारी संस्थांच्या 66 हजार 147 थकीत पिक कर्जदार सभासदांच्या खात्यात 627.47 कोटीची रक्कम जिल्हा बँक मार्फत जमा करण्यात आलेची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक संगिता डोंगरे यांनी दिली.
याप्रसंगी बँकेचे प्रशासक संगिता डोंगरे यांनी माहिती देताना पुढे सांगितले, आधार प्रमाणीकरणासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीमधील 1 लाख 16 हजार 512 कर्जदार सभासदांपैकी आजअखेर 1 लाख 5 हजार 228 सभासदांनी आधार प्रमाणीकरण पुर्ण केलेले आहे. तर 11 हजार 284 शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण मयत, अँग्रीस्टक फार्मर आयडी नसणे, परगावी/स्थलांतरीत, बायोमॅट्रिक कॅप्चर न होणे व इतर कारणांमुळे प्रमाणीकरण झालेले नाही. ज्या शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया होऊ शकेल, अशा सर्व शेतकरी सभासदांकडे बँक व संस्थे मार्फत पाठपुरावा करुन आधारप्रमाणीकरण करुन घेणेची प्रक्रिया आहे. जिल्ह्यात विविध कार्यकारी संस्थांच्या थकीत पिक कर्जदार सभासदांची 1 लाख 92 हजार 282 कर्जखात्याची 2 हजार 419.15 कोटी शासन पोर्टलवर अपलोड केलेली होती.
यापैकी दोन कर्जखाते संख्या 1 लाख 61 हजार 217 यांच्या कर्जापोटी 1 हजार 495.37 कोटीची आहे. यात सरकारच्या ओटीएस अंतर्गत जिल्हा बँकेची कर्जखाते संख्या 31 हजार 65 असून त्यांची रक्कम 923.78 कोटी आहे. याबाबत शासन पोर्टलवर माहिती अपलोड केले असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यामध्ये नगर जिल्ह्यातील शेतकरी सभासदांचे कर्ज माहिती अपलोड करणे, आधार प्रमाणीकरण करुन घेणे व शासनाकडुन प्राप्त झालेल्या रकमा शेतकरी सभासदांचे खात्यावर वेळेत जमा करणे मोठे व आवाहनात्मक काम जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव व त्यांची यंत्रणा तसेच बँक कर्मचारी यांनी अतिशय कष्ट घेऊन वेळेत पुर्ण केले.
यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका सहनिबंधक सहकारी संस्था व सर्व शासकीय लेखापरिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. यामुुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेचे कामकाज राज्यात अव्वल स्वरुपाचे झालेची दखल शासन पातळीवर घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक गौतम निकाळजे यांनी दिली.
कर्जमाफीमुळे पाच महिन्यांच्या व्याजाचा प्रश्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत राज्य सरकारने दोन लाखांच्या रक्कमेची कर्जमुक्ती केली. ही रक्कम 9 ऑगस्टपासून राज्यातील पात्र शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, कर्जमाफीपूर्वी 1 एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांतील शेतकर्यांच्या कर्जावर व्याजाची आकारणी करून नयेत, असे आदेश राज्य सरकारच्यावतीने देण्यात आलेले आहे. या आदेशामुळे राज्यातील बँकांसह सेवा सोसायट्या आर्थिक अडचणीत सापडणार आहे. एकट्या नगर जिल्हा बँकेच्या व्याजाची पाच महिन्यांची रक्कम 110 कोटीपर्यंत आहे.




