Thursday, May 2, 2024
Homeनाशिक...तर नाफेडकडून अत्यल्प खरेदी का?

…तर नाफेडकडून अत्यल्प खरेदी का?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दरवर्षी नाफेड कांदा (Onion) खरेदी सुरू होताच कांदा दर वाढतात, असा सर्वसाधारण अनुभव असताना यावर्षी मात्र, नाफेडची (Nafed) कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर कांद्याचे भाव वाढण्याऐवजी उलट कमी कसे झाले? याबरोबरच नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक आहे, असे म्हटले जाते तर मग बाजार समितीत नाफेडकडून अत्यल्प खरेदी का?असा मुद्दा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी उपस्थित केला आहे….

- Advertisement -

नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे सांगितले. परंतु, नाफेडची कांदा खरेदी खरोखरच पारदर्शक असती तर नाशिकसह महाराष्ट्रातील विविध कांदा उत्पादक जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी होत असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसले असते.

संपूर्ण महाराष्ट्रात बाजार समित्यांचे मोठे जाळे असतांना केवळ पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव या दोनच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडकडून थेट शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होत आहे. ही खरेदीही अगदी मोजक्याच वाहनांमधून होत आहे.

संपूर्ण देशातून अडीच लाख टन कांदा खरेदी पैकी महाराष्ट्रातून दोन ते सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी करायची असतांनाही बाजार समितीत रोज केवळ 8 ते 10 वाहनांमधूनच नाफेडकडून कांदा खरेदी सुरू आहे.

उर्वरित कांदा खरेदी ही फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या फेडरेशनमार्फत सुरू असून शेतकऱ्यांना कांद्याला 18 ते 20 रुपये उत्पादन खर्च येत असतांना नाफेडकडून मात्र, सरसकट 9 ते 11 रुपयाने खरेदी सुरू आहे.

मोजक्याच फेडरेशनला नाफेडने कांदा खरेदी दिली आहे. हीच बाब मुळात संशयास्पद असून संबंधित फेडरेशनचा कांदा खरेदीचा पूर्वानुभव तपासल्याचे मात्र यात दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा नाफेडच्या यावर्षीच्या कांदा खरेदीच्या माध्यमातून ठराविक घटकांनाच जास्त फायदा पोहचेल,अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

…तर भ्रष्टाचाराची पोल-खोल

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे नाफेडच्या संपूर्ण कांदा खरेदीच्या बाबतीत असंख्य शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून नाफेडकडून पारदर्शकपणे कांदा खरेदी सुरू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे म्हणणे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून फेटाळण्यात येत आहे आणि नाफेडच्या संपूर्ण कांदा खरेदीवर महाराष्ट्र राज्य कांदा संघटनेचे बारकाईने लक्ष असून नाफेड कांदा खरेदीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची पोल-खोल करू.

– भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या